Katraj Pune Crime News | शहापूरचा तरुण दांडिया पहायला आला आणि टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : Katraj Pune Crime News | गावाच्या यात्रेला जाण्यासाठी तो शहापूरहून मामाकडे आला. मामाच्या मुलाबरोबर दांडिया पाहण्यासाठी गेला. तेथे टोळक्याने कोयते हवेत फिरवत दहशत माजविली. तेव्हा सर्व जण पळून जाऊ लागले. हा तरुणही पळत असताना खाली पडला आणि टोळक्याच्या तावडीत सापडला. कोणतेही कारण नसताना टोळक्याने त्याच्या डोक्यावर, कानावर, पाठीवर सपासप वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)
अर्जुन दिलीप मोरे (वय १९, रा. आत्मा मालिक विर्श्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, मोहिली, अघाई, शहापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police) फिर्याद दिली आहे. त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी अमित चोरगे, अक्षय सावंत, अभी सावंत, अजय रांजणे, प्रसाद रांजणे व त्यांच्या तीन ते चार साथीदारांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कात्रजमधील संतोष नगर येथील अय्यप्पा स्वामी मंदिरासमोर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मामा अरुण कदम यांचे कराड तालुक्यातील तुळसण येथे यात्रा असल्याने ते ९ ऑक्टोंबरला गावी जाणार होते. मामाबरोबर जाण्यासाठी अर्जुन मोरे हे पुण्यात आले होते. मामाचा मुलगा राज कदम याच्याबरोबर दुचाकीवरुन ते अय्यप्पा स्वामी मंदिरासमोर दांडिया पाहण्यासाठी गेले. तेथे दांडिया पहात असताना काही वेळाने मोटार सायकलवरुन मुलांचे टोळके आले. त्यांनी धारदार हत्यारे हवेत फिरवून आरडा ओरडा करुन शिवीगाळ करत दहशत माजवू लागले. त्यामुळे तेथे रास दांडिया खेळणारे व पाहणारे सर्व लोक तेथून पळून जाऊ लागले. फिर्यादी व राज हे दोघे घाबरुन तेथून पळून जात असताना त्यांच्यापैकी एकाने राज याच्यावर वार केला. परंतु, राजने तो वार चुकवल. त्याच्या उजव्या हाताला जखम झाली. त्यावेळी राज पळून गेला.
https://www.instagram.com/p/DA6FtraC3fQ/
फिर्यादीही पळून जात असताना पायात पाय अडकून तो खाली पडला. खाली पडल्याने तो टोळक्याच्या तावडीत सापडला. सर्वांनी आरडाओरडा करीत त्यांचे हातातील धारदार हत्याराने डोक्यात, कानावर, पाठीवर सपासप वार करुन जखमी केले. फिर्यादी हे वाचवा वाचवा असे ओरडू लागले. त्याचवेळी एक महिला पोलीस त्यांच्या मदतीसाठी पळत येत असताना या टोळक्याने पाहिले व ते सर्व जण तेथून मोटारसायकलीवरुन पळून गेले. त्यानंतर फिर्यादी यांना रक्तभंबाळ अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोणाशीही काही संबंध नसताना केवळ दहशत माजविण्यासाठी शहापूरच्या या तरुणाचा जीवे मारण्याचा प्रयत्न या टोळक्याने केला. भारती विद्यापीठ पोलिसांनी सर्वांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे (API Sameer Shende) तपास करीत आहेत.