Warje Malwadi Pune Crime News | पुणे: बनावट कागदपत्र्याद्वारे दवाखाना उघडून तो करत होता तब्बल २२ वर्षे वैद्यकीय प्रॉक्टिस; बनावट डॉक्टराविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Warje Malwadi Pune Crime News | महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन यांच्याकडून मान्यताप्राप्त शैक्षणिक अर्हता प्राप्त न करता बनावट कागदपत्रे सादर करुन नोंदणी करुन दवाखाना उभारुन तब्बल २२ वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे. (Fake Doctor)
बिभुती बिमल बागची (वय ४३, रा. गोकुळनगर पठार, गुरु निवास, वारजे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महापालिकेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्रीय अधिकारी डॉ. अरुणा सूर्यकांत तारडे (वय ४५, रा. पिंपळे गुरव) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police) फिर्याद दिली आहे. हा प्रकार वारजे येथील सय्यदनगरमधीलम् मुळव्याध उपचार केंद्र येथे २००२ पासून आजतागायत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिभुती बिमल बागची याने वारजे येथील सय्यदनगरमध्ये मुळव्याध उपचार केंद्र हा दवाखाना सुरु केला. त्याने एन डी (N D), बी ई एम एस (B E M S), एन डी (N D) ही पदवी घेतली असल्याचे भासवून महाराष्ट्र काऊन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन यांच्याकडून मान्यता प्राप्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केली नाही.
खोटी कागदपत्रे सादर करुन नोंदणी करुन व्यवसाय करत होता. याबाबत एका नागरिकाने महापालिकेकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार फिर्यादी व त्यांच्या सहकार्यांनी प्रत्यक्ष दवाखान्याला भेट देऊन पाहणी केली. बिभुती बागची याच्याकडील कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाले. तसा अहवाल आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला. त्यांच्या आदेशानुसार आता या बोगस डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार भिंगारदिवे तपास करीत आहेत.