Warje Malwadi Pune Crime News | रिक्षा स्टँडवरही आता मालकी हक्क? स्टँडवर रिक्षा उभी केल्याने रिक्षाचालकाने रिक्षाचालकाचा केला हात फ्रॅक्चर

पुणे : Warje Malwadi Pune Crime News | रिक्षा स्टँड हा सर्व रिक्षाचालकांसाठी ग्राहकांना घेऊन जाण्यासाठी असतो. पण काही जणांना तो आपल्या मालकीचा असल्यासारखे वाटते. रिक्षास्टँडवर कोणी रिक्षा लावायची हे त्यांच्या मनावर अवलंबून असल्याचे दिसते. इथे आमचा रिक्षा स्टँड आहे, असे म्हणून एका रिक्षाचालकाला दुसर्‍या रिक्षाचालकाने बेदम मारहाण केली. त्यात रिक्षाचालकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

याबाबत अश्विन विनायक कडु (वय ४७, रा. कोंढवे धावडे) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रिक्षाचालक निलेश दत्तात्रय भगत (रा. रामनगर, वारजे) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वारजे पुलाखालील साईबाबा मंदिरासमोर रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षाचालक आहे. ते वारजे पुलाखाली रिक्षा स्टँडवर थांबून पॅसेंजरची वाट पहात होते. यावेळी त्यांच्या तोडओळखीचा रिक्षाचालक निलेश भगत तेथे आला. त्याने फिर्यादी यांना इथे आमचा रिक्षा स्टँड आहे. येथे थांबायचे नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तेथील रस्त्यावर बाजूला पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून फिर्यादीला फेकून मारला. त्यामुळे फिर्यादी यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. फिर्यादी यांना गंभीर जखमी करुन निलेश भगत याने तुला कोठे जायचे तिकडे जा, मला फरक पडत नाही, अशी धमकी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.