Sharad Pawar NCP | अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातील नेता पक्षाला रामराम करणार; संकेत देत म्हणाले – ‘तुतारी फुंकल्यावर आवाज येणारच!’

Nana Kate

चिंचवड : Sharad Pawar NCP | अजित पवारांचा (Ajit Pawar NCP) बालेकिल्ला म्हणून पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातील एक-एक नेता शरद पवारांच्या पक्षात दाखल होताना दिसत आहे. दरम्यान आता नाना काटे (Nana Kate) यांनीही मोठी घोषणा केली आहे.

“अजितदादा यांच्यानंतर शरद पवार साहेबांशी माझी नाळ अधिक जुळलेली आहे. तेव्हा तुतारी फुंकल्यावर आवाज येईलच”, असे म्हणत चिंचवड विधानसभा लढण्याच्या दृष्टीने आचारसंहिता लागण्याच्या अगोदर नवा मार्ग स्वीकारणार असल्याचे काटे यांनी म्हंटले आहे. त्यामुळे अजित पवारांना चिंचवड विधानसभेत (Chinchwad Assembly) मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

माध्यमांशी बोलताना नाना काटे म्हणाले, ” चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढवायची, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. आम्हाला निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या भेटी घेत असतो.

अजितदादांनी म्हटलंय की, ज्यांना लढायचं आहे, त्यांना मार्ग मोकळे आहेत. आता लढायचं म्हटलं तर कोणतातरी पक्ष आणि चिन्ह पाहिजेच. त्यामुळे आता मी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेईन”, अशी भूमिका काटे यांनी मांडली.

अजित पवार हे सध्या महायुतीसोबत (Mahayuti) असले तरी जागावाटपात चिंचवडची जागा भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. याउलट महाविकास आघाडीत चिंचवडची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाट्याला येऊ शकते. त्यामुळेच नाना काटे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याची शहरात चर्चा सुरु आहे.