Swargate Pune Crime News | प्रवाशांना जबरदस्तीने लुटणार्या रिक्षाचालकांची टोळी जेरबंद ! स्वारगेट पोलिसांची कामगिरी; 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण

पुणे : Swargate Pune Crime News | स्वारगेट येथून प्रवाशांना रिक्षामध्ये घेऊन त्यांना वाटेत लुटणार्या रिक्षाचालकांच्या टोळीला स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police Station) जेरबंद केले आहे. पोलिसांनी १०० ते १५० सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यांच्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेतला. (Gang of Auto Drivers Arrested In Robbery Case)
रोहित सुभाष चव्हाण (वय २३, रा. गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी, हडपसर) हा रिक्षाचालक व त्याचे साथीदार मयुर ऊर्फ संकेत प्रकाश चव्हाण (वय १९, रा. मंतरवाडी, देवाची ऊरुळी) आणि सुदर्शन शिवाजी कांबळे (वय २२, रा. म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध सिंहगड रोड, बंडगार्डन, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ आणि स्वारगेट पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
स्वारगेट येथील पीएमपी बसस्टँडपासून फिर्यादी तरुण २७ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊ वाजता रिक्षात बसला होता. रिक्षा काही अंतरावर गेल्यावर रिक्षाचालकाने फोन करायचा म्हणून त्याच्याकडून मोबाईल घेतला. पर्वती इंडस्ट्रीज जवळील बसस्टॉपजवळून त्याने रिक्षा फिरवून लुल्लानगर परिसरात नेली. फिर्यादीकडील रोख ५०० रुपये तसेच गळ्यातील चांदीची चैन व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला होता. तसेच ४ हजार रुपये ऑनलाईन मागवून घेऊन मोबाईलचा पासवर्ड विचारुन घेऊन जबरदस्तीने त्यांना उतरवुन ते पळून गेले होते.
या गुन्ह्याचा तपास करताना गुन्ह्यात १०० ते १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गुन्हा रात्रीच्या वेळी घडला असल्याने काही एक उपयुक्त माहिती मिळाली नाही. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा शोध घेतला असता आरोपी रोहित चव्हाण हा त्याचे राहते घराचे परिसरात मिळाला. त्याने गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली. चोरी केलेला माल व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा ८० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil), पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील (IPS Smartana Patil), सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी (ACP Nandini Vagiyani) यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे ( PI Yuvraj Nandre) यांच्या सुचनेनुसार तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajgane), पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे (PSI Ravindra Kaspte), पोलीस अंमलदार मोराळे, तनपुरे, शिंदे, टोणपे, खेंदाड, शेख, पवार, घुले, चव्हाण, दुधे यांनी केली आहे.