Pune Crime News | पूनर्वसन सेंटरची बदनामी करण्याची भिती दाखवून खंडणी उकळली; छावा संघटनेच्या सचिन भिसेसह सहा जणांवर गुन्हा दाखल, अनुप लोखंडे आत्महत्या प्रकरण

पुणे : Pune Crime News | अंमली पदार्थाची सवय सोडविण्यासाठी उपचार व पुनर्वसन सेंटरमध्ये उपचाराला दाखल केलेल्या तरुणाने आत्महत्या केली. यावरुन छावा संघटनेच्या (Chhava Sanghatna) सचिन भिसे (Sachin Bhise) व इतरांनी ७० लाख रुपयांची मागणी केली. उपचार व पुनर्वसन सेंटरबाहेर आंदोलन करुन बदनामी करण्याची धमकी देऊन ३ लाख रुपये खंडणी स्वीकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Extortion Case)
याप्रकरणी डॉ. नितीन विरसिंग दलाया (वय ५९, रा. बाणेर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सचिन भिसे (रा. वाकड), रिना आडागळे (रा. ताडीवाला रोड) आणि अन्य चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शास्त्री रोडवरील सॅफ्रॉन हॉटेल व इतर ठिकाणी २८ सप्टेबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान घडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे नित्यानंद व्यसनमुक्ती केंद्र आहे. या केंद्रात अनुप लोखंडे याला भरती करण्यात आले होते. त्याने ६ ऑगस्ट २०२४ रोजी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचे कारण सांगून सचिन भिसे व इतरांनी ७० लाख रुपयांची मागणी केली. ही रक्कम नाही दिल्यास ते फिर्यादीच्या विरोधात खोटा गुन्हा नोंद करतील. तसेच त्यांचे उपचार व पूनर्वसन केंद्राबाहेर सचिन भिसे चालवत असलेल्या छावा संघटनेमार्फत पुणे, नाशिक, नगर, बीड, लातूर, इगतपुरी येथून २ हजार लोकांना गोळा करुन आंदोलन करतील.
फिर्यादी व त्यांचे केंद्राची बदनामी करुन उपचार व पूनर्वसन केंद्रे बंद करतील, अशी धमकी वेळोवेळी देऊन फिर्यादी यांच्याकडून ३ लाख रुपयांची खंडणी स्वीकारली. वेळोवेळी फोनद्वारे संपर्क साधून फिर्यादी यांना विविध कारणाने दमदाटी करत अधिक रुपयांची मागणी करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.