Pimpri Chinchwad Crime Branch News | तब्बल 70 वाहनचोरीचे गुन्हे असलेल्या सराईत चोरट्याकडून 15 गुन्हे उघडकीस (Video)

पिंपरी : Pimpri Chinchwad Crime Branch News | पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी चिंंचवड, धाराशिव, अहिल्यानगर या ठिकाणी वाहनचोरीचे ७० गुन्हे असलेल्या सराईत वाहन चोरट्याला जेरबंद करुन गुन्हे शाखा युनिट २ ने १५ गुन्हे उघडकीस आणले आहेत. (Arrest In Vehicle Theft Case)
शंकर भरत देवकुळे (वय ३२, रा. उरुळी देवाची, ता. हवेली़ मुळ रा. फकीरानगर, वैरागनाका ता. जि. धाराशिव) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. आरोपी हा हँडल लॉक नसलेल्या, मेट्रो स्टेशन व निर्जनस्थळी पार्किंग केलेल्या मोटारसायकली व रिक्षा बनावट चावीचा वापर करुन तो चोरी करत होता. चोरीची वाहने अशिक्षित लोकांना विक्री करुन पैसे कमविण्याचे प्रयत्नात असताना त्यास गुन्हे शाखेकडून पकडण्यात आले आहे.
वाहनचोरीचा तपास करण्यात येत असताना पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी व पोलीस हवालदार जयवंत राऊत यांना त्यांच्या बातमीदारांकडून बातमी मिळाली की, एक जण चोरीची मोटारसायकल घेऊन खराळवाडी भागात फिरत आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे एक पथक तयार करुन तात्काळ बातमीची खातरजमा करण्यास पाठविले. पिंपरीतील खराळवाडी येथील पंजाब केमिकल फॅक्टरीजवळ एक जण पल्सर मोटारसायकलसह थांबला असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांना पाहून तो पळू लागला. परंतु, पोलिसांनी अगोदरच त्याला घेरले असल्याने त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. शंकर देवकुळे याने त्याच्याकडील पल्सर मोटारसायकल मेट्रो स्टेशन येथून चोरल्याची कबुली दिली. अधिक तपासात त्याने पिंपरी चिंचवड शहर, पुणे शहर तसेच शांतीनगर भिंवडी येथून एकूण १३ मोटारसायकली व २ रिक्षा बनावट चावीचा वापर करुन चोरल्याची कबुली दिली.
निगडी पोलीस ठाणे ३, चिंचवड पोलीस ठाणे २, भारती विद्यापीठ २, भोसरी, पिंपरी, दिघी, रावेत, हडपसर, खडकी, वानवडी आणि शांतीनगर भिवंडी येथील प्रत्येकी एक असे १५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पिपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, शिवानंद स्वामी, दिलीप चौधरी, प्रमोद वेताळ, जयवंत राऊत, उषा दळे, देवा राऊत, नामदेव कापसे, विपुल जाधव, सागर अवसरे, आतिष कुडके, अजित सानप, संदेश देशमुख, शिवाजी मुंढे, उद्धव खेडकर यांनी केली आहे.