Khed Pune Crime News | पुणे: वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 9 वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरातून हळहळ व्यक्त

Khed Pune Crime News

पुणे / खेड : Khed Pune Crime News | वडिलांबरोबर पोहायला शिकायला गेलेला नऊ वर्षीय मुलगा पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. दुर्वेश संदेश हजारे (वय-९ वर्षे) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. कनेरसर (ता. खेड) येथे सडकवस्ती रविवारी (दि.६) सकाळी दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कनेरसर येथील सडकवस्ती येथे दुर्वेश संदेश हजारे हा नववर्षीय चिमुकला वडिलांबरोबर विहीरीत पोहण्यासाठी गेला होता. दूर्वेशच्या पाठीला बांधलेले पेटे सुटल्यामुळे तो पाण्यात बुडाला. खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन स्थानिक लोकांच्या मदतीने पाण्यात शोध घेतला. मात्र दुर्वेशचा मृत्यदेह मिळाला नाही.

स्थानिक रहिवासी, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर काही कालावधीनंतर मृतदेह सापडला. दरम्यान गावात शोककळा पसरली असून दुर्वेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.