Harshvardhan Patil | हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; झोपेबाबतच्या विधानावर म्हणाले – ‘मला वाटतं की…’

Harshvardhan-Patil-Sharad-Pawar

इंदापूर : Harshvardhan Patil | राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे (Mahayuti) अनेक नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षात सामील होत आहे. आज हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश (Sharad Pawar NCP) केला. एकेकाळी काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून हर्षवर्धन पाटलांकडे पाहिलं जायचं. २०१९ मध्ये आपल्यावर अन्याय होतोय म्हणत त्यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. (Indapur Assembly Constituency)

दरम्यान इंदापूर विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे राहील. या मतदारसंघातून तेच आमदार असतील, असा शब्द घेऊन त्यांनी लोकसभेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाला याप्रमाणे इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आहेत. त्यामुळे महायुतीत ही जागा अजित पवार गटाला जाणार हे जवळपास निश्चित असल्याने हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज त्यांनी अधिकृत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

“इंदापूरमधल्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा होती. हा जनतेचा उठाव आहे. सर्व जातीधर्मांच्या लोकांचा हा उठाव आहे. त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात आपण प्रवेश करावा. त्यानुसार तो प्रवेश आज होतोय. माझ्यासह सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हजारोंच्या संख्येने पक्षप्रवेश करत आहोत”, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हंटले.

हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे केलेल्या एका विधानामुळे बरीच चर्चा झाली होती. “भाजपामध्ये आल्यापासून आता चौकशी वगैरे काही नाही. शांत झोप लागते”, असे ते म्हणाले होते. त्यावरून आता त्यांना प्रश्न विचारले जात आहेत.

‘इकडे हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागेल’ या संजय राऊतांच्या विधानावर त्यांनी प्रतिक्रिया दिली .ते म्हणाले, “मला वाटतं की झोपेच्या संदर्भात एक गैरसमज झालेला दिसतोय. प्रत्येकाला लागेल तेवढीच झोप लागत असते. त्यापेक्षा काही अतिरिक्त झोप लागत नसते”, असे हर्षवर्धन पाटील यांनी म्हंटले आहे.