Eknath Shinde-Bachchu Kadu | मुख्यमंत्री शिंदेंचा बच्चू कडूंना झटका; विधानसभेच्या तोंडावर आमदार साथ सोडणार; बच्चू कडू म्हणाले – ‘शिंदेंनी जो एक घाव केला त्याच्यावर आम्ही…’

अमरावती : Eknath Shinde-Bachchu Kadu | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर अनेक नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीला (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) आव्हान देण्यासाठी प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती, भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन नवीन आघाडीबाबत घोषणा केलेली असताना आता बच्चू कडूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) बच्चू कडूंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याची कार्यक्रम पत्रिका समोर आली आहे.
या पत्रिकेवरून बच्चू कडू यांचा फोटो गायब आहे, तर एकनाथ शिंदे यांचा फोटो मोठ्या आकारात छापण्यात आला आहे. या पत्रिकेमुळे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. बच्चू कडू यांनीही याला दुजोरा दिला आहे.
बच्चू कडू म्हणाले, “आपापला राजकीय स्वार्थ असेल, त्यानिमित्ताने ते गेले असेल. त्याची आम्हाला काही परवा नाही, त्यांनी आहे तिथे सुखाने राहावं. पण, शिंदे साहेबांनी जो एक घाव केला आहे, त्याच्यावर आम्ही हजारो घाव देऊ. त्यांनी एक खेळी खेळली आम्ही खेळी खेळू. त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू”, असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे.
“आम्ही राजकुमारजींसोबत मैत्री कायम ठेवून आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू. कसं आहे की, दिव्यांग मंत्रालय दिलं होतं म्हणून त्यांचं ऋण आमच्यावर होतं. आम्ही ते डोक्यात ठेवू. पण, त्यांनी खेळलेली खेळी त्यांना घातक ठरेल”, असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.