Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणात नवीन माहिती समोर ; कोयत्याचा धाक दाखवत तिघांनी आळीपाळीने केला बलात्कार

पुणे : Gang Rape In Bopdev Ghat Pune | बोपदेव घाटात मित्रासह फिरायला गेलेल्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांत (Kondhwa Police) तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे.
पीडित तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत मित्राला ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार करण्यात आला. यासोबतच बलात्कार करण्यापूर्वी आरोपींनी या दोघांकडे असलेल्या मौल्यवान वस्तू काढून घेतल्या.
तरुण तरुणी हे बोपदेव घाटातील टेबल पॉईंटवर फिरत असताना आरोपींनी त्यांना एकटे गाठले. त्यांना धमकावत आडबाजूला नेले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. त्यानंतर मित्राला मारहाण केली. त्याचा शर्ट काढून त्याचे हात बांधण्यात आले. तसेच पॅन्टचा बेल्ट काढून त्याचे पाय बांधले. या तीन आरोपींकडे कोयता, लाकडी बांबू आणि धारदार चाकू होता. मित्राला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर तिघांनी आळीपाळीने बलात्कार केला.
काही वेळानंतर आरोपी त्या निघून गेल्यानंतर मुलीने स्वतःला सावरत मित्राचे हातपाय सोडवले. त्यानंतर ते दोघे वारजे येथील तरुणीच्या खोलीवर गेले. पीडित तरुणीने बहिणीला घडलेला सर्व प्रसंग सांगितला. त्यानंतर, हे सर्वजण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये गेले. तेथे प्राथमिक उपचार घेऊन मुलीला ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) नेण्यात आले.
आता या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींच्या वर्णनावरून त्यांचे रेखाचित्र तयार केले आहे. त्यावरून पोलीस तपास करीत आहेत. आरोपींचा शोध घेतला जात असून रेखाचित्रातील वर्णनाप्रमाणे दिसणाऱ्या व्यक्तींची माहिती पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.