Eknath Shinde Davos Tour | स्वित्झर्लंड दौऱ्यात राज्य मंत्रिमंडळाची कोटींची उधारी; कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस; महायुती सरकारवर विरोधकांचे टीकास्त्र

Rohit-Pawar-Eknath-Shinde

मुंबई : Eknath Shinde Davos Tour | स्वित्झर्लंडमधील कंपनीने १.५८ कोटींची उधारी चुकविण्यासाठी आता राज्य सरकारच्या विभागाला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही याबाबत समाजमाध्यमावरून प्रश्न उपस्थित केला आहे.

राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील मंत्री आणि काही अधिकाऱ्यांनी जानेवारी महिन्यात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेला हजेरी लावली होती. या दौऱ्यात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या राहण्या-खाण्याचे बिल बाकी असल्याचे आता समोर आले आहे. त्याबाबत ही नोटीस आल्याची माहिती आहे.

या प्रकरणावरून महायुती सरकारवर (Mahayuti Govt) निशाणा साधताना आमदार रोहित पवार म्हणाले, ” दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्र सरकार खाऊन पिऊन आले. पण बिल उधार ठेवून आले. आता उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने राज्य सरकारला नोटीस पाठवली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या अशा दळभद्रीपणामुळे आंतराष्ट्रीय गुंतवणुकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणाऱ्या दावोस परिषदेसारख्या मंचावर महाराष्ट्राची बदनामी होऊ शकते, गुंतवणूकदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी संबंधित यंत्रणेला सदरील विषय निकाली काढण्याचे आदेश द्यावेत, ही विनंती”, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

याला प्रत्युत्तर देताना सदर नोटीस मिळाल्याचे मान्य करत उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, “आम्ही अधिकचा खर्च केलेला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून तसा आरोप केला जात आहे. आमचा विधी विभाग या नोटीशीला उत्तर देईल”, असे त्यांनी म्हंटले आहे.