BJP Worker Mayur Mundhe | पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर बांधणाऱ्या पुण्यातील पदाधिकाऱ्याचा भाजपला रामराम; दिली ‘ही’ कारणे

पुणे: BJP Worker Mayur Mundhe | विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय हालचाली वाढताना दिसत आहेत. सर्वच पक्षांनी विधानसभेसाठी कंबर कसलेली आहे. लोकसभेला फटका बसल्याने आता आगामी विधानसभेसाठी भाजपकडून (BJP) रणनीती आखण्यात आली आहे. (PM Narendra Modi Temple In Pune)

त्यामध्ये मतदारसंघातील उमेदवार ठरवताना त्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे मत विचारात घेतले जाणार आहे. भाजपाचा ‘लिफाफा’ पॅटर्न’ चांगलाच चर्चेत आहे. असे असताना २०२१ साली पंतप्रधान मोदी यांना देवाचा दर्जा देत चक्क ‘मोदी मंदिरा’ची उभारणी करणाऱ्या कार्यकर्त्याने भाजपला रामराम ठोकला आहे.

भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी बांधलेले हे मंदिर मोठा चर्चेचा विषय ठरले होते. दरम्यान मुंडे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना पत्र लिहीत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामध्ये पक्ष सोडण्यामागची कारणेही त्यांनी नमूद केली आहेत.

“मी मागील अनेक वर्षांपासून भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे. मी औंध पुणे वार्ड अध्यक्षांपासून ते छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचा (Shivaji Nagar Assembly Pune) युवा मोर्चा उपाध्यक्ष पदापर्यंत पक्ष संघटनेचे काम अत्यंत निष्ठेने केले आहे.

पण भाजपामध्ये गेल्या काही वर्षांपासून निष्ठावंत वगळून बाहेरील विष्ठेला जास्त महत्त्व दिले जाते आहे. त्यामुळे मी माझ्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देतो आहे”, असं मयुर मुंडे यांनी बावनकुळेंना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

भाजपमध्ये स्थानिक आमदाराच्या मर्जीने आणि शिफासरीने संघटनेतील पद वाटप होत आहेत. निष्ठावंत वगळून मर्जीतील बाहेरून भरती केलेल्या ठेकेदारांना ही पदं दिली जात आहेत. तसेच माजी पदाधिकाऱ्यांना अपमानिक केले जात आहे. त्यांना बैठकीला बोलवण्यात येत नाही.

यामुळे पक्षाचा तसेच विधानसभा मतदारसंघाचा विकास खुंटला आहे. या कारणांमुळे मी माझ्या सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तसेच जनतेच्या सेवेसाठी सार्वजनिक क्षेत्रात सदैव सक्रीय राहणार असल्याचे त्यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे.