Wakad Pune Crime News | पुणे: अपंग असल्याने 46 वर्षाच्या मुलाला वडिलोपार्जित मालमत्तेतून बेदखल करण्याचा प्रयत्न; 74 वर्षाच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे : Wakad Pune Crime News | धाकटा मुलगा जन्मत: अपंग असल्याने आई त्याचा तिरस्कार करते. कागदपत्रावर त्याच्या जबरदस्तीने सह्या घेण्याचा आई प्रयत्न करते. आईच्या अशा वागण्यामुळे आपल्याला मानसिक त्रास झाला असून त्यातून ह्दयविकाराचा त्रास जडला आहे. अपंग असल्यामुळे आई आपल्याला वडिलोपार्जित मालमत्तेतून बेदखल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करत मुलाने आईविरोधात तक्रार केली आहे. ताथवडे येथे राहणार्‍या ४६ वर्षाच्या मुलाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वाकड येथे राहणार्‍या ७४ वर्षाच्या आईवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जन्मत: अपंग आहेत. त्यामुळे आपला आई तिरस्कार करते असे त्यांचे म्हणणे आहे. ते सोमेश्वरवाडीत आई, वडिल, मोठा भाऊ व त्याची पत्नी असे रहात होते. त्यांचे २०१० मध्ये लग्न झाले. त्यांची पत्नी आय टी कंपनीत कामाला आहे. १८ डिसेबर २०२२ रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी आईने त्यांनी तयार केलेल्या कागदपत्रांवर सह्या करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी आईला सांगितले की तुम्ही यापूर्वी माझ्या सह्या घेतल्या आहेत. मी अपंग असल्याने माझी आई मला वडिलोपोर्जित मालमत्तेमध्ये कुठलाही हिस्सा देणार नसल्याचे हेतूने फिर्यादीकडून वेगवेगळ्या कागदपत्रांवर सह्या घेत होती. त्यास फिर्यादी यांनी नकार दिला. त्यामुळे वडिलांच्या मृत्यु पश्चात करण्यात आलेल्या विधीदरम्यान त्यांना अपंग असल्याचे विधी करुन दिले नाहीत. तसेच विधी सुरु असताना नातेवाईकांसमोर अपंगत्वावरुन टोमणे मारुन अपमानित केले.

सोसायटीच्या सार्वजनिक पार्किंगमध्ये सर्वांदेखत त्यांना अपंग म्हणून हिणवले. फिर्यादींना वारंवार जाणीव करुन त्याच्या आत्मसन्मानास ठेच पोहचविली. १८ एप्रिल २०२३ रोजी त्यांच्या आईने त्यांना काही कागदपत्रांवर सह्या करण्यास सांगितले होते. ही कागदपत्रे कशाची आहेत, अशी विचारणा त्यांनी केली असता तू केवळ सह्या कर, असे म्हणून धमकावू लागली. त्याला फिर्यादीने विरोध केला. त्याचा राग येऊन फिर्यादीच्या केसांना धरुन व्हीलचेअरवरुन खाली पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पत्नी तेथे असल्याने तिने सावरले. मोठ्या भावाला त्यांनी सांगितले. तेव्हा त्याने काही प्रतिसाद दिला नाही. या घटनेमुळे त्यांचे मानसिक स्वास्थ बिघडले. त्यांना ह्दयविकाराचा त्रास सुरु झाला. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळत गेला. त्यामुळे त्यांच्याकडून कामे होण्यास दिरंगाई होऊ लागल्याने त्यांना सक्तीचे रजेवर पाठविले गेले. जुले २०२३ पासून ते घरीच आहेत.

आईच्या धमक्या, टोमणे, मानसिक त्रास यामुळे फिर्यादी हे २४ जुलै २०२४ रोजी राहते घर सोडून ताथवडे येथे रहायला गेले आहेत. त्यानंतर आता मानसिक स्वास्थ सुधारल्यावर त्यांनी आई विरुद्ध फिर्याद दिली आहे. अपंग व्यक्तीचे अधिकारी अधिनियम २०१६ अंतर्गत पोलिसांनी आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील (PSI Shamal Patil) तपास करीत आहेत.