Sambhaji Bhide | ‘बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान’, संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले – ‘आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू’

सांगली : Sambhaji Bhide | नवरात्रोत्सवानिमित्ताने सांगलीत श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धारकऱ्यांना मार्गदर्शन करताना संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदु समाज, असे वक्तव्य भिडे यांनी केले आहे.
गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे”, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता आक्षेप घेतला जात आहे.
संभाजी भिडे म्हणाले, “आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू. नवरात्र उत्सवात करमणुकीचे कार्यक्रम सुरू आहेत. हे सर्व सण-उत्सवांचा नाश करत चालले आहेत. शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवलाय. पण गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्राचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “जगाच्या पाठीवर असंख्य देशांनी आक्रमण केलेला बेशर्म लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. आतापर्यंत आपल्या देशावर ७६ राष्ट्रांनी आक्रमणं केली आहे. ते आता पाठलाग करत असून आपण पाय लाऊन पळत आहोत.
हिंदी- चिनी भाई- भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्याला दुर्दैवाने मिळाला. हिंदू – मुस्लिम भाई – भाई, हिंदुंना शत्रू कोण, वैरी कोण, वाईट कोण, चांगलं कोण हे कळत नाही. महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात”, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे.