Ajit Pawar NCP | अजित पवारांनी सरड्याचे डायनासोर केले म्हणत भाऊसाहेब भोईर यांचा पक्षाला रामराम; चिंचवड विधानसभा लढविणार

Bhausaheb-Bhoir

पिंपरी : Ajit Pawar NCP | आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर अजित पवारांना एकामागून एक धक्का मिळताना दिसत आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) अपवाद वगळता सर्वच महत्वाचे नेते त्यांची साथ सोडत शरद पवार गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पक्षातील डॅमेज कंट्रोल रोखण्याचे मोठे आव्हान अजित पवार यांच्यासमोर आहे.

त्यातच आता अजित पवारांनी सरड्याचे डायनासोर केल्याचे म्हणत त्यांचेच समर्थक असलेले शहरातील जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर (Bhausaheb Bhoir) यांनी अजित पवारांना रामराम ठोकला आहे. भोईर यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत महानिर्धार मेळावा घेतला आणि कोणत्याही परिस्थितीत आगामी काळातील चिंचवड विधानसभा निवडणुक (Chinchwad Assembly Constituency) लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान या कार्यक्रमातून भोईर यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील भाजपचे विद्यमान आमदार त्याचबरोबर अजित पवार यांनाही व्यासपीठावरून खुले आव्हान दिले आहे. मोरयाची भक्ती हा माझा पक्ष आणि चाफेकरांची क्रांती हा माझा लक्ष असे म्हणत भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करून निवडणूक लढण्यासाठी निर्धार व्यक्त केला आहे. यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

आपण अनेकवेळा अजित पवारांवर विश्वास ठेवला मात्र त्यांनी वेळोवेळी आपला विश्वासघात केला आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी वृत्ती असलेल्यांची एक पिढी निर्माण केल्याचा आरोप देखील भोईर यांनी जाहीर सभेत बोलताना केला आहे.