Pune Rural Police News | चोरलेल्या कार तामिळनाडूत नेऊन स्पेअर पार्ट करुन होतेय विक्री ! सराईत वाहनचोराकडून 11 लाखांच्या दोन कार हस्तगत

पुणे : Pune Rural Police News | राज्यातून चोरलेल्या कार तामिळनाडुत नेऊन तेथे त्याचे स्पेअर पार्ट वेगळे करुन त्याची विक्री केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामीण पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक करुन त्यांच्याकडून चोरलेल्या ११ लाख रुपयांच्या दोन कार हस्तगत केल्या आहेत. (Arrest In Vehicle Theft)

नदीम दाऊद शेख (वय ३२, रा. धाड, ता. जि. बुलढाणा, सध्या रा. कुंबेफळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर) असे या वाहनचोराचे नाव आहे. नदीम याच्यावर अहमदनगर, पुणे ग्रामीण, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा या जिल्ह्यात चारचाकी वाहन चोरीचे ११ गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षात स्थानिक गुन्हे शाखेने ४ चारचाकी वाहने तामिळनाडु राज्यातून हस्तगत केल्या होत्या. (Pune LCB)

शिरुर येथून मारुती सुझुकी कंपनीची पांढर्‍या रंगाची इरटीगा कार चोरीला गेली होती. याबाबत योगेश आनंदा गुंड (रा. बाबुराव नगर, शिरुर) यांनी २६ ऑगस्ट रोजी फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. वाहन चोरीला गेलेल्या ठिकाणापासून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. चोरीला गेलेले वाहन अहमदनगरच्या बाजुकडे गेल्याचे निष्पन्न झाले. अशा प्रकारचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार नदीम शेख यानेच हा गुन्हा केला असल्याचा संशय निर्माण झाला. त्यांचा शोध सुरु करण्यात आला. बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरुरमधून त्यानेच कार चोरली असून सध्या तो देऊळगाव राजा येथे आले. त्यानुसार पोलिस पथकाने देऊळगाव राजा येथे जाऊन त्याला पकडले.

याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने शिरुरमधील कार तसेच संगमनेरमधून कार चोरल्याचे कबुल केले. पोलिसांनी ११ लाख ४० हजार रुपयांच्या दोन्ही कार जप्त केल्या आहेत. विशाल जाधव व किशोर पवार या साथीदाराच्या मदतीने या कार चोरल्याची त्याने कबुली दिली.

चोरीची पद्धत

नदीम हा कार चोरी करण्यापूर्वी पंजाबमधील जुना बाजार मार्केटमधून ओ बी डी स्टार नावाचे इलेक्ट्रानिक मशीन व कारच्या डुप्लीकेट चावी प्राप्त करुन घेत. असे. चावीचे मॉडेल हे ज्या वर्षातील आहे, त्याप्रमाणे कारचे मॉडेल चेक केले जाते. त्यासाठी काचेवर नमूद असलेले मॉडेलचे वर्ष पाहून कारचे ड्रायव्हर बाजूचे काचेतून तार किंवा पट्टा टाकून दरवाजा उघडला जातो. त्यानंतर ओ बी डी स्टार नावाचे इलेक्ट्रॉनिक मशीन कारला कनेक्ट करुन सिस्टीम चालू करुन डुप्लीकेट चावी ही अ‍ॅक्टीव्ह केली जाते. कार चालू करुन चोरी करतात. कार पुढे तामिळनाडु, कर्नाटक राज्यात पाठविली जाते. किंवा कारचे स्पेअर पार्ट करुन विक्री केली जाते, असे त्याने सांगितले.

नदीम याने पंजाबमधून आणलेले ओ बी डी स्टार हे इलेक्ट्रॉनिक मशीन, डुप्लीकेट चाव्या, ड्रिल मशीन, स्कु ड्रायव्हर असे साहित्य जप्त केले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्धन शेळके, संजू जाधव, राजू मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, सागर धुमाळ, शिरुर पोलीस ठाण्याचे अंमलदार नाथासाहेब जगताप, विजय शिंदे, नितेश थोरात, योगेश गुंड यांनी केली आहे.