Pune PMC News | पावसाळा संपेपर्यंत क्षेत्रिय कार्यालय स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन पथकं कार्यरत ठेवा; महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांचे आदेश
पुणे : Pune PMC News | बुधवारपासून शहरात सुरू झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर पाणी साचणार्या भागात नेमण्यात आलेली क्षेत्रिय कार्यालयाकडील आपत्ती व्यवस्थापन पथक पुन्हा कार्यन्वीत करा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale) यांनी अधिकार्यांना दिले आहेत. दरम्यान, पूराच्यावेळी सिंहगड रस्त्यावरील नदीकाठच्या वसाहतींमध्ये पाणी शिरल्या प्रकरणाची नेमलेल्या समितीचा अहवाल हा प्रशासकीय कामाचा अंतर्गत भाग असल्याचे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
बुधवारी रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील रस्ते, भुयारी मार्ग पाण्याखाली गेले होते. अवघ्या दोन तासांत ढगफुटी सदृश्य पावसामुळे शहरातील वाहतूक काहीतास ठप्प झाली होती. परंतू पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी महापालिका आयुक्तांनी पावसाळ्याच्या पहील्या टप्प्यात नेमलेली पथके दिसून आली नाहीत. यामुळे कोंडीत अधिकच भर पडली होती. यासंदर्भात महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले पावसाळा संपेपर्यंत क्षेत्रिय कार्यालयामार्फत तयार केलेली पथके कार्यन्वीत राहातील, यासाठी आदेश देण्यात आले आहेत. प्रामुख्याने रस्त्यावरील पावसाळी गटारांच्या जाळ्यांमध्ये साठणारा कचरा स्वच्छ करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील पावसाळी गटारे ही पन्नास मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेची आहेत.प्रत्यक्षात १२४ मि.मी. पाउस पडल्याने पाणी वाहून जाण्यात अडचणी आहेत. मागील काही वर्षातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता पुढील काळात पावसाळी गटारांचे आकारमान आणि रचनेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी पावले उचलण्यात येतील.
पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील एकता नगरी आणि परिसरातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरते. हा नेहमीचा अनुभव आहे. यंदाच्या वर्षी वसाहतींमध्ये रात्रीच्यावेळी पाणी शिरले. यावरून पाटबंधारे विभाग, महापालिका, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. भोसले यांनी याची माहिती घेण्यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल नुकताच महापालिकेला प्राप्त झाला आहे. रात्रीच्यावेळी नागरिकांना पूर्व कल्पना न देता धरणातून मोठ्याप्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याच्या आरोपांना डॉ. भोसले यांनी धरणाच्या पुढील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याचे नमूद करत अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.