Wakad Pune Crime News | वाकड येथील पंजाब नॅशनल बँकेत टोळक्यांचा धुडगुस ! बँक मॅनेजरला मारहाण करुन कर्मचाऱ्यांना धमकावले

पिंपरी : Wakad Pune Crime News | बँकेत ग्राहकांबरोबर आलेल्या लहान मुलांना चप्पल बुट घालून सोफ्यावर खेळू नका असे सांगितल्याने त्यांच्या आई वडिलांनी बँक मॅनेजरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर इतर नातेवाईकांना बोलावून बँकेत गोंधळ घालत कर्मचार्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली.
याबाबत बँक मॅनेजर मोहम्मद रझा काद्री (वय ३३, रा. बालेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कौसुर नुर मोहम्मद शेख, अल्फिया आरिफ शेख (रा. पोलीस लाईन कॉर्नर, वाकड), रिझवान नुर सय्यद, आवेश मतिन खान, साहिल जोगदंड, आयशा आरिफ शेख (सर्व रा. नूर मंजील, पवार नगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वाकडमधील पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank in Wakad Pune) २१ सप्टेबर रोजी दुपारी ३ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौसुर शेख व अल्फिया शेख हे त्यांच्या लहान मुलांसोबत बँकेत आले होते. लहान मुले चप्पल, बुट घालून सोफ्यावर खेळत होते. तेव्हा बँक मॅनेजर मोहम्मद क्रादी यांनी लहान मुलांना चप्पल बुट घालून सोफ्यावर खेळु नका, असे सांगितले. फिर्यादी यांच्या बोलण्याचा राग येऊन कौसुर व अल्फिया शेख यांनी फिर्यादी यांना हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर अल्फिया शेख हिने तिचे भाऊ बहिण यांना फोन करुन बँकेत बोलावून घेतले. त्यांनी फिर्यादी यांना त्यांच्या कामात अडथळा करुन काम करुन देणार नाही, अशी धमकी दिली. बँकेमधील महिला कर्मचारी व इतरांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक भारत माने तपास करीत आहेत. (PNB Wakad)