Sharad Pawar On Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले – “जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा,पण…”

Sharad Pawar-Manoj Jarange Patil

रत्नागिरी : Sharad Pawar On Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलेलं आहे. दरम्यान आता मराठा आरक्षणावरून शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे. पण इतर लहान समाजांनाही सोबत घ्यावं, अशी भूमिका पवारांनी मांडली आहे.

रत्नागिरी याठिकाणी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. हा पाठिंबा देत असताना समाजातील इतर लहान घटकांनाही सोबत घेतलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मराठा समाजाचं एक वैशिष्ट्ये होतं की, हा समाज इतर जाती- जमातींना सोबत घेऊन जाणारा आहे.

अगदी शिवछत्रपतींच्या काळापासून बघितलं तरी अठरापगड जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन रयतेचं राज्य उभा करण्याचा आदर्श शिवछत्रपतींनी घालून दिला आहे आणि तीच भावना आजही समाजातील सर्व घटकांमध्ये आहे.

त्यामुळे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची आरक्षणाची मागणी योग्य आहे आणि ही मागणी करत असताना इतर समाजातील लोकांचा विचार करावा, अशी भूमिका अनेकांनी मांडली आहे. विशेषतः जरांगे पाटील यांनी स्वतःही अशी भूमिका मांडली आहे.

त्यांनी सांगितलं की धनगर (Dhangar Reservation), मुस्लीम (Muslim Reservation), लिंगायत (Lingayat Reservation) अशा इतर समाजालाही आरक्षण मिळावं. त्यामुळे सर्व लहान घटकांना सोबत घ्यावं, असं आमचं म्हणणं आहे,” अशा शब्दांत शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.