Pune Crime Branch News | जबरी चोरीचा बनाव करुन खून ! चोरट्यांची संख्या सांगताना चुकली आणि प्लॅन फसला, 10 तासात आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात

पुण्यातील कर्वेनगरमध्ये अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला खून
पुणे : Pune Crime Branch News | मैत्रिपूर्ण ओळखी वरुन केलेली मारहाण, पत्नीकडे सतत घेत असलेला संशय यावरुन होत असलेला अडथळा दूर करण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बनाव करुन पतीवर वार करुन त्याचा खून केला. परंतु, हा बनाव पोलिसांनी अवघ्या १० तासात दूर करुन एकाला अटक केली.
अमोल निवंगुणे (वय ४२, रा. कर्वेनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर, प्रसन्न साहेबराव कोकरे (वय २७, रा. आनंद विहार, सिंहगड रोड) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल निवंगुणे हे घरात झोपले असताना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोणीतरी दरवाजा वाजविला. त्यांनी दरवाजा उघडल्यावर एकाने घरात शिरुन त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. घरातील दागिने, रोख रक्कम घेऊन पळून गेला. दिसताना हा जबरी चोरीचा प्रकार असल्याचे दिसून येत होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, सरदार पाटील, परमार यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी दिलेल्या सुचना व तांत्रिक विश्लेषण केल्यावर हा जबरी चोरीचा प्रकार नसल्याचा पोलिसांना संशय आला.
चोरट्यांची संख्या सांगताना चुकली अन प्लॅन फसला
चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यु झाल्याचा बनाव अमोल याच्या पत्नीने केला होता. तिला वाटत होते की आपला बनाव पचला़ पण, वेगवेगळ्या पोलीस अधिकार्यांनी कसा घडला प्रकार हे सांगताना तिने दोन चोरटे असल्याचे सांगितले. तर सीसीटीव्हीमध्ये एकच जण आलेला दिसत होता. त्यांच्या एका मुलीने पहाटेच्या सुमारास चोरटा ओळखीचा वाटत असल्याचे सांगितले. दोन मुली घाबरुन घरातच बसल्या होत्या. त्याचवेळी पोलिसांना प्रसन्न कोकरे याच्याविषयी माहिती मिळाली. प्रसन्न कोकरे याचे नाव घेताच अमोल याच्या पत्नीच्या चेहर्यावरील हावभाव बदलले़ आणि पोलिसांचा संशय खरा ठरला.
तोपर्यंत गुन्हे शाखेच्या पथकाने प्रसन्न कोकरे याचा ठावठिकाणी काढला होता. तो सिंहगड रोडवरील घराजवळ आल्याचे दिसून येताच पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडे चौकशी करता त्याने गुन्हा कबुल केला.
निवंगुणे याच्या पत्नीशी त्याची मैत्रीपूर्ण ओळख होती. त्यावरुन अमोल याने प्रसन्न कोकरे याला मारहाणही केली होती. अमोल पत्नीला आरोपीच्या नावाने संशय घेत होता. अमोल याने केलेली मारहाण व मैत्रीपूर्ण संबंधात अडथळा ठरलेल्या अमोल याला संपविण्यासाठी त्यांनी जबरी चोरीचा बहाणा करुन त्याचा खून केला. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने आरोपीला पुढील कारवाईसाठी वारजे पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकावडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, हवालदार सयाजी चव्हाण, हवालदार गणेश ढगे, दुर्योदन गुरव, पोलीस अंमलदार राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, महेश पाटील, साईकुमार कारके, अंकुश भिसे यांनी केली़ या तपासात वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे व तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सहकार्य केले.