Bachchu Kadu On Mahayuti | ‘आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?’, महायुती सोडल्यावर बच्चू कडूंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘अजून काही नेत्यांसोबत आमची चर्चा…’

Bachchu-Kadu.jpg

पुणे : Bachchu Kadu On Mahayuti | प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू, स्वराज्य संघटनेचे संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati), भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर (Rajratna Ambedkar), स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्यासारख्या इतर छोट्यामोठ्या संघटनांनी एकत्र येऊन तिसऱ्या आघाडीची घोषणा केली आहे. पुण्याच्या व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ‘परिवर्तन महाशक्ती’ची (Maharashtra Parivartan Mahashakti) घोषणा करण्यात आली.

यावेळी झालेल्या बैठकीत स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शंकरराव धोंडगे (Dhondge Shankarrao), स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप (Wamanrao Chatap), भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुश (Narayan Ankush) आदी नेते या बैठकीला उपस्थित होते.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “महाराष्ट्रातील जनता अस्वस्थ झालेली असून त्यांना सक्षम आणि सुसंस्कृत पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील सध्याचे राजकारण पाहता, पूर्वी मोठ्या गावांना बुद्रुक आणि छोट्या गावांना खुर्द म्हटलं जायचं तशीच शिवसेना आणि राष्ट्रवादीची अवस्था झालेली आहे. आमच्या या परिवर्तन महाशक्तीमध्ये येण्यासाठी आम्ही मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी देखील चर्चा करत आहोत. त्यांनी देखील आमच्या या आघाडीच्या सोबत यावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.”

आमदार बच्चू कडू म्हणाले, “येत्या २६ तारखेला संभाजीनगर इथं मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अजून काही नेत्यांसोबत आमची चर्चा सुरू आहे. समविचारी लोकांना एकत्रित घेऊन राज्यातील २८८ जागांवर आम्ही आमचे उमेदवार लढवणार आहोत.”

महायुतीतून बाहेर पडला का, असं बच्चू कडू यांना यावेळी माध्यमांनी विचारलं असता, ते म्हणाले , “आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का, की मी महायुतीत बाहेर पडलो आहे ते ?. संभाजीनगरमध्ये आम्ही जे आंदोलन केलं, त्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. म्हणून आम्ही महायुतीतून बाहेर पडलो आहोत,” असं यावेळी बच्चू कडू म्हणाले.