Khadki Pune Crime News | खडकीत दोन गटात धुम्रचक्री ! घरातील साहित्याची तोडफोड केली तर दुसर्याने चक्क घरच दिले पेटवून

पुणे : Khadki Pune Crime News | खडकीमधील महादेववाडी (Mahadevwadi Khadki) येथे दोन गटात वाद होऊन त्यात दोन्ही गटाने एकमेकांच्या घरात शिरुन घरातील टीव्ही, काचेची भांडी यांची तोडफोड केली़ तर दुसर्या गटाने चक्क घर पेटवून दिले.
याबाबत सविता सुनिल साळुंखे (वय ५५, रा. महादेववाडी, खडकी) यांनी खडकी पोलिसांकडे (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हिना तायडे, सलमान शेख, कुणाल जाधव, दीपक लोखंडे, आसमा लोखंडे, आनंद माने, बशीर, सिकंदर शेख आणि अमित यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महादेववाडी येथे मंगळवारी रात्री साडेअकरा ते बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मुलगा गणेश साळुंखे ऊर्फ छोटा लोहार व हिना तायडे, तिचा भाऊ सलमान शेख यांच्यात १६ सप्टेबर रोजी वाद झाला होता. या वादातून आरोपी लाठी व लोखंडी हत्यार घेऊन १८ सप्टेबर रोजी रात्री दीड वाजता त्यांच्या घरी आले. सलमान शेख याने ‘‘ आज इनको जिंदा छोडने का नाही ,’’ असे म्हणून फिर्यादीचे पती सुनिल साळुंखे यांच्या डोक्यावर कोयत्याने वार केला. सुनिल साळुंखे हे खाली वाकल्याने त्याचा वार चुकला. फिर्यादी, त्यांचा पती व मुलगा हे घरातून पळून रेल्वे मार्गावर आले. त्यावेळी हिना तायडे हिने ‘‘ये फिर से भाग गये, इनका घर जला दो,’’ असे म्हणून मोठमोठ्याने ओरडु लागले. त्यानंतर हिना तायडे व त्यांच्या साथीदारांनी त्यांच्या घराला आग लावली. या आगीमध्ये त्यांचे घर पुर्णपणे जळून खाक झाले. त्यात अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यांच्या वस्तीत राहणारे उज्ज्वला खुडे व लक्ष्मी कंगणे आणि आणखी दोन ते तीन लोकांचे घर फोडून घरातील सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. तेथून जाताना सलमान हा मोठ मोठ्याने आरडाओरडा करुन ‘‘हमसे पंगा लोगे तो जिंदा ही जला देंगे’’ असे म्हणत दहशत करत निघून गेला. याप्रकरणी पोलिसांनी ९ जणांना अटक केली आहे.
त्याविरोधात हिना ऊर्फ रिना फकिरा तायडे (वय २८, रा. महादेववाडी, खडकी) हिने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शुभम उमाळे, बापू चांदणे, लेजली, दीपक डोके, किरण खुडे, छोटा लोहार, प्रथमेश काळे, आफ्रिद गुंडया, अमन डोके, बबलु डोके, मॅडी (सर्व रा. महादेववाडी, खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी या १६ सप्टेबरला रात्री अकरा वाजता जेवण करुन घराबाहेर आला असताना त्यांच्या वस्तीतील दीपक डोके, किरण खुडे, छोटा लोहार, प्रथमेश् काळे व आफ्रिद ऊर्फ गुड्या हे दारु पिऊन गोंधळ घालत होते. त्यावेळी फिर्यादी व त्यांचा भाऊ सलमान शेख यांनी येथे दारु पिऊन वाद करु नका व घाण घाण बोलु नका असे सांगितले. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. फिर्यादी या १७ सप्टेबरला रात्री साडेअकरा वाजता घरासमोर उभ्या होत्या. त्यावेळी शुभम उमाळे व इतर आरोपी हातात कोयता, लाकडी दांडके घेऊन आले. फिर्यादी यांनी मार चुकवून बाजुला थांबल्या. तेव्हा ते जबरदस्तीने फिर्यादीच्या घरात घुसले. घरातील सामानाची तोडफोड करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावर दीपक डोके व शुभम उमाळे यांनी हातातील कोयता दाखवून त्यांना धमकावले. हातातील कोयत्याने घराची तोडफोड करुन ‘‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादी लागले तर कोणाला जिवंत सोडणार नाही,’’ असे म्हणत ते निघून गेले. त्यांच्या दहशतीने आजूबाजूच्या लोकांनी दरवाजे बंद करुन घेतली होती. ते निघून गेल्यावर फिर्यादी यांनी घरात पाहिले तर सर्व सामान अस्ताव्यस्त पडले होते. घरातील टी व्ही, कपाट, काचेच्या वस्तू फोडल्या होत्या. भांडे अस्ताव्यस्त पडले. लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले २० हजार रुपये व ३० हजार रुपयांचे २ कानातले जोड व नाकातील फुले चोरुन नेले. त्यांच्या वस्तीतील फिर्यादीचे दाजी दीपक सुरेश लोखंडे यांचेही घर फोडलेले दिसून आले. खडकी पोलिसांनी ११ जणांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सतीश जगदाळे (PI Satish Jagdale) तपास करीत आहेत.