Hinjewadi Pune Murder Case | प्रेमसंबंधाच्या संशयावरुन शिक्षकाने तरुणाचा केला खून; बिहारला जाऊन पत्नीचाही करणार होता खून, हिंजवडी पोलिसांनी केली अटक (Videos)

पिंपरी : Hinjewadi Pune Murder Case | पत्नीबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बिहारमधील एका शिक्षकाने पुण्यात येऊन पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरुन खून केला. त्यानंतर बिहारला पळून जात असताना मानपाडा (Manpada) येथे हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) दोघांना पकडले.

प्रविणकुमार भोला महतो (वय २६, रा. मच्छाही, जि. मुजफ्फरपूर, बिहार) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. राजीवकुमार नथुनीप्रसाद सिंह (वय ३३, रा. मच्छाही, जि, मुजफ्फरपूर, बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण एनडीए रोडवरील तुषार बालवडकर यांची जागा असलेल्या ग्रीन ड्रिम नर्सरीचे ताडपत्रीच्या शेडमध्ये एकाचा गळा चिरुन खून करण्यात आल्याची माहिती बुधवारी पहाटे २ वाजता हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्याबाबत आजू बाजूला चौकशी केल्यावर त्याचे नाव प्रविणकुमार महतो असल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने ४ पथके तयार करुन तपास सुरु केला. त्यात प्रविणकुमार महतो व राजीव कुमार याची पत्नी यांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर आली. तसेच राजीवकुमार हा बावधन येथे येऊन गेल्याचे तांत्रिक विश्लेषणात दिसून आले. तो सध्या ठाणे जिल्ह्यातील मानपाडा येथे असल्याचे लक्षात आले. कल्याण पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी राजीवकुमार व त्याचा साथीदार धीरजकुमार यांना पकडले.

राजीवकुमार हा सरकारी शिक्षक आहे. त्याचा पत्नीबरोबर घटस्फोटाचा खटला सुरु आहे. दोघांचे अनैतिक संबंध असल्याची माहिती राजीवकुमार याला मिळाली होती. तसेच त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते पाहून तो बिहारहून पुण्यात आला. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास झोपलेल्या प्रविणकुमार याचा चाकूने गळा चिरुन त्याचा खून केला व त्यानंतर ते मुंबईला पळून चालले होते. तेथून तो बिहारला जाणार होता. बिहार येथे गेल्यावर पत्नीचा देखील खून करणार असल्याचे त्याने सांगितले. त्यापूर्वीच हिंजवडी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्याने एका महिलेचा जीव वाचला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (Vinoy Kumar Choubey), सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर (Shashikant Mahavarkar), अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी (IPS Vasant Pardeshi), पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड (DCP Vishal Gaikwad), सहायक पोलाीस आयुक्त सुनिल कुहाडे (ACP Sunil Kurade) यांच्या मार्गदर्शनाखाली हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात (Sr PI Kanhaiya Thorat), पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे (PI Rishikesh Ghadge), सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले (API Prashant Mahale), पोलीस उपनिरीक्षक बंडु मारणे (PSI Bandu Marne), पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, नरेश बलसाने, बापूसाहेब धुमाळ, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, कैलास केंगले, विक्रम कुदळ, संजीव सावंत, संतोष डामसे, अरुण नरळे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, ओमप्रकाश कांबळे, स्वप्नील साबळे, मंगेश लोखंडे यांनी केली आहे.