MLA Hiraman Khoskar On Dhangar Reservation | धनगर आणि धनगड जाती एकच असल्याचा लवकरच शासन आदेश; काँग्रेस आमदाराचा सरकारला इशारा; म्हणाले – ‘…तर मी लगेच राजीनामा देणार’

congress

मुंबई : MLA Hiraman Khoskar On Dhangar Reservation | राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडले जात आहे. आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाज (Maratha Samaj) रस्त्यावर उतरत आहे तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) देऊ नये म्हणून ओबोसी समाज (OBC Samaj) रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबतचा हा प्रश्न तापलेला असताना आता विधानसभेच्या तोंडावर धनगर समाजाच्या आरक्षणावर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यासाठी सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्यासाठी धनगर आणि धनगड या जाती एकच असल्याचा शासन आदेश काढण्यासाठी राज्य सरकारने एक समिती नेमली आहे. एकीकडे धनगर समाजाला अनुसूचित जातीतून आरक्षण देण्यासाठी सरकारकडून प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे सत्ताधारी आमदारांकडून याला विरोध होता ना दिसत आहे.

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी विरोध केला आहे. एवढंच नाही तर याबाबत आपला राजीनामा देण्याचा इशाराही दिला आहे.

आमदार हिरामण खोसकर म्हणाले, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे. त्याबाबत आमची भूमिका अशी आहे की, यासंदर्भात नरहरी झिरवळ यांच्या घरी आमची दोन तास बैठक झाली. आमचं एकच म्हणणं आहे की, आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे. त्या आमच्या आरक्षणामध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ नये. धनगर समाजाला वेगळं आरक्षण द्यावं. त्यासाठी आम्ही सरकारला विरोध करणार नाही.

मात्र, आज परिस्थिती अशी आहे, आई-वडिलांनी मुलांना मोलमजुरी करून शिकवलं, पण आज त्या मुलांना नोकरी मिळत नाही. अनेक मुले बिगारी काम करत आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर आमच्या मुलांना मजुरी केल्याशिवाय पर्याय नाही”, असे खोसकर यांनी म्हंटले आहे.

ते पुढे म्हणाले, “आमचा धनगर समाजाला आरक्षण देण्यास काहीही विरोध नाही. मात्र, सरकारने धनगर समाजाला वेगळं आरक्षण द्यावं. असं केलं तर त्यांचंही नुकसान नाही आणि आमचंही नाही. आतापर्यंत आम्ही बैठक घेत आहोत. आमची पुढची दिशा ठरवणार आहोत. त्यामध्ये पिचड, गावीत, नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांच्यासह आमचे जे जेष्ठ नेते आहेत ते पुढची दिशा ठरवणार आहेत.

मात्र, जो आमदार बैठकीला येणार नाही. त्या आमदाराला संघटना, समाज माफ करणार नाही. कोणी सत्तेत आहे, म्हणून बैठकीला आलं नाही आणि सत्तेच्या आड कोणी काही लपण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला समाज आणि संघटना मतदारसंघात फिरकू देखील देणार नाही”, असा इशाराच खोसकर यांनी दिला आहे.