MLA Bharat Gogawale | “आता मंत्रीपद दिलं तरी घेणार नाही”, शिंदे गटाच्या आमदाराची नाराजी; 5 ऑक्टोबरला आचारसंहिता लागणार म्हणत पुन्हा एकदा थोपटले दंड

रायगड : MLA Bharat Gogawale | शिवसेनेत झालेल्या बंडानंतर शिंदे गटाचे (Shivsena Shinde Group) आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी उत्साही होते. मात्र, रायगडमध्ये महायुतीकडून आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना मंत्रिपद देण्यात आले तर पालकमंत्रिपदी उदय सामंत (Uday Samant) यांनी वर्णी लागली. राज्यात ज्यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार सत्तेत आले त्यावेळेपासून भरत गोगावले यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याचे दिसून येतेय.
शिंदेंच्या पहिल्या मंत्रिमंडळात भरत गोगावले यांचं नाव निश्चित असताना काही कारणामुळे त्यांना संधी नाकारली गेली. त्यानंतरही प्रत्येकवेळी भरत गोगावले यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा झाली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता होती, मात्र, दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याने भरत गोगावलेंनी नाराजी व्यक्त केली.
गोगावले मागील अनेक महिन्यांपासून मंत्रिपद मिळून मी रायगडचा पालकमंत्री होईल,असे जगजाहीर सांगत होते. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावर त्यांनी अनेकदा भाष्य केले आहे. हे अधिवेशन संपल्यावर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास मी त्यात असणार आहे. त्याबाबत दुमतच नाही. तर रायगडचा पालकमंत्री ही असेल, असा दावा गोगावलेंकडून करण्यात येत होता. मात्र त्यांची निराशा झाली.
आता मंत्रीपद दिलं तरी घेणार नाही, पुढील मंत्रीमंडळात वर्णी लागणार असल्याचे म्हणत आमदार भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. “आता पुढील काळात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही कारण अवघे २० दिवस उरलेले आहेत. येत्या ५ ऑक्टोबरला आचारसंहिता लागणार असून १० ते १२ नोव्हेंबरला निवडणूका पार पडणार आहेत”, असे वक्तव्य विधान भरत गोगावले यांनी केलं आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्यांत विधानसभा निवडणूका होणार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.