Sharad Pawar NCP – Girish Mahajan BJP | गिरीश महाजनांना रोखण्यासाठी शरद पवारांचा नवा डाव; भाजप नेता तुतारी फुंकणार?

जामनेर : Sharad Pawar NCP – Girish Mahajan BJP | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून लढण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीत पक्षाला १० पैकी ८ जागा मिळवता आल्या. त्यामुळे पक्षात बंड होऊनही शरद पवारांची राजकीय ताकद कमी न होता आणखीन ती वाढल्याचे पाहायला मिळालं.
दरम्यान अनेक मतदारसंघात पवार गळ टाकत आहेत. काही मतदारसंघात उमेदवार त्यांच्या हाताशी लागलेले आहेत. काहींनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे तर काहीजण पक्ष प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.
आता शरद पवारांनी आपला मोर्चा जळगावकडे वळवला असून भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन यांच्या विरोधात शरद पवार एका मात्तबर नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार असल्याची माहिती मिळत आहे.
पक्षाची शिवस्वराज्य यात्रा २१ तारखेला जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. या यात्रेला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या यात्रेदरम्यान भाजपचे जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
खोडपे यांच्याकडे मराठा चेहरा म्हणून पाहिले जाते. एकट्या जामनेर मतदारसंघात मराठा समाजाची तब्बल १ लाख ४० हजार मतदान आहे. त्यामुळे दिलीप खोडपे हे गिरीश महाजन यांच्या समोर तगडे आव्हान देण्याची शक्यता आहे.
“मागील ३५ वर्षांपासून आपण भाजपचे काम करत आहे. गेल्या १० वर्षापासून भाजपमध्ये आपली घुसमट होत आहे. त्यामुळे आपण भाजपचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत”, असे दिलीप खोडपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
राष्ट्रवादी शरद पवार गटात सहभागी होऊन जामनेर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत आपली याबाबत प्राथमिक बोलणी झाल्याने आपण तयारी सुरू केल्याचंही खोडपे यांनी म्हटले आहे.