Maharashtra Assembly Election 2024 | राज्यातल्या राजकीय वातावरणाचा भाजपला अंदाज येईना; परराज्यातील नेत्यांचे दौरे; केंद्रीय नेतृत्व राज्यात तळ ठोकून
मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभेची तयारी सुरु झालेली आहे. राज्यात कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. लोकसभेप्रमाणे आता विधानसभेलाही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (Mahayuti Vs Mahavikas Aghadi) असा सामना असणार आहे. दोन्हीकडे तीन-तीन पक्ष आहेत. राजकीय हालचालींना वेग आलेला आहे.
इच्छुक उमेदवार आपणाला उमेदवारी ज्या पक्षात मिळेल तिकडे प्रवेश करताना दिसत आहेत. एकाच मतदारसंघात अनेकजण इच्छुक असल्याने बंडखोरीची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती समोर हे मोठे आव्हान असणार आहे.
अशातच आता भाजपाला राज्यातल्या राजकीय वातावरणाचा अंदाज लागेनासा झाला आहे. भाजपकडून परराज्यातील नेते महाराष्ट्रात पाठवण्यात आले आहेत. वातावरणाचा रोख लक्षात घेण्यासाठी भाजपचे केंद्रीय नेतृत्व राज्यात तळ ठोकून आहे.
लोकसभेला भाजपला मोठा फटका बसला. त्यामुळे आता विधानसभेला असा धोका टाळण्यासाठी भाजपने रणनीती आखल्याचे दिसत आहे. गुजरात, उत्तर प्रदेश , मध्यप्रदेश अशा राज्यातून भाजप नेते राज्यात येऊन जनतेचा कल लक्षात घेत आहेत. त्यावरून पुढची वाटचाल ठरवण्यात येणार असल्याची माहिती आहे.
अजित पवारांना सोबत घेतले तर लोकसभेसारखा फटका बसेल का? असे अनेक प्रश्न भाजप श्रेष्ठींना सतावत आहेत. राज्यातून काय फीडबॅक येतोय याची चाचपणी सुरु आहे. यातूनच उमेदवार कोण असेल? हे ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतच लोकसभेला मदत केलेल्या छोट्या पक्षांनाही जागा द्यायच्या आहेत. यामुळे जागावाटपाचा फॉर्म्युला महायुतीत आव्हान असणार आहे.