Pune Crime News | इंधन कंपन्यांच्या टँकरमधून इंधन चोरी करणारी टोळी अटकेत; एक हजार 620 लिटर डिझेल जप्त

चोरीसाठी इलेक्ट्रीक मोटारीचा वापर
पुणे : Pune Crime News | इलेक्ट्रीक मोटारीचा वापर करून हिंदूस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या कंपन्यांच्या आगारातील टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली. लोणी काळभोर (Loni Kalbhor) येथे ही कारवाई करण्यात आली. चोरट्यांकडून एक हजार ६२० लिटर डिझेल, टँकर असा ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, शुभम सुशील भगत (वय २३, रा. थेऊरफाटा), तृशांत राजेंद्र सुंभे (वय ३१), रवी केवट (वय २५, रा. बोरकरवस्ती), विशाल सुरेश गोसावी (वय ३०, रा. थेऊरफाटा), किरण हरीभाऊ आंबेकर (वय ३१, रा. कदमवाकवस्ती), रोहीत कुमार (वय २१, रा. बोरकरवस्ती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी टँकरमालक श्रीकांत उर्फ सोन्या राजेंद्र सुंबे, तसेच प्रवीण सिद्राम मडीखांबे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
लोणी काळभोर भागातील कदमवाकवस्ती भागात हिंदूस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल कंपनीचे आगार आहे. तेथून टँकरमध्ये पेट्रोल-डिझेल भरून ते नियोजीत मार्गाने पेट्रोलपंपाकडे पाठविण्यात येतात. चोरटे टँकरचालकांशी संगममत करून पेट्रोल-डिझेल चोरी करत असल्याची माहिती मुंढवा पोलीस ठाण्याचे (Mundhwa Police Station) सहायक निरीक्षक राजू महानोर (API Raju Manohar) , पोलीस कर्मचारी शिवाजी जाधव, मल्हारी ढमढेरे यांना मिळाली. हडपसर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांना याबाबतची माहिती कळविण्यात आली. त्यानंतर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र करणकोट (PI Rajendra Karankot), उपनिरीक्षक अमोल घोडके (PSI Amol Ghodke) यांच्यासह पथकाने सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी परिसरातील मोकळ्या जागेत बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या शेड परिसरात कारवाई केली. त्यावेळी आरोपी हे टँकरमधून पेट्रोल-डिझेल चोरी करताना आढळून आले. इलेक्ट्रीक मोटारीचा वापर करून चोरटे टँकरमधून इंधन चोरत असल्याचे उघडकीस आले.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma), परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त आर. राजा (DCP R Raja), गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे (DCP Nikhil Pingle) , सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.
अशी केली जायची चोरी
टँकर मालक श्रीकांत सुंबे याच्या सांगण्यावरून आगारातून इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांशी संगनमत करून रस्त्यात निर्जन ठिकाणी नेण्यात यायचे. तेथे डिझेल चोरी केली जायची. त्यानंतर चोरलेले डिझेल प्रवीण मडीखांबे हा काळ्याबाजारात विक्री करत असे.
ऑईल माफिया मडीखांबे विरूध्द यापूर्वीही गुन्हे दाखल
मडीखांबेविरुद्ध यापूर्वीही इंधन चोरीचे गु्न्हे दाखल झाले असून, तो लोणी काळभोरमध्ये ऑईल माफिया म्हणून ओळखला जातो.