Chandrashekhar Bawankule On Kirit Somaiya | किरीट सोमय्यांनी पक्षाचा आदेश धुडकावला, भाजप प्रदेशाध्यक्षांची प्रतिक्रिया; म्हणाले, दिलेली जबाबदारी… “

Chandrashekhar Bawankule On Kirit Somaiya

मुंबई : Chandrashekhar Bawankule On Kirit Somaiya | विधानसभा निवडणूक (Maharashtra Assembly Election 2024) तोंडावर असताना भाजप नेते किरीट सोमय्या पक्षावर नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी पक्षाच्या वरिष्ठांनाच खडेबोल सुनावले आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची घोषणा मला न विचारता केली, ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे, असं पत्र किरीट सोमय्यांनी रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना लिहिलं आहे.

त्याची प्रत त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील पाठवली आहे. आपल्या या समितीचा मी सदस्य नाही, पुन्हा अशी अवमानास्पद वागणूक देऊ नये, अशा शब्दांत सोमय्यांनी रावसाहेब दानवे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सुनावलं आहे.

किरीट सोमय्या यांची विधानसभा निवडणूक संपर्कप्रमुखपदी नियुक्ती पक्षाकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे पद नाकारलं आहे. त्यामुळे सोमय्या यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

यासंदर्भात त्यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून भाजपाच्या नेतृत्वाला नकार कळवला आहे. तसेच यासंदर्भात त्यांनी एक पत्रकही प्रसिद्ध करत भाजपा निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष व माजी खासदार रावसाहेब दानवे यांना पाठवलं आहे.

या सर्व प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माजी खासदार किरीट सोमय्या हे भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत. मात्र, पक्षाचे नेतृत्व हे कोणाला विचारून एखादे पद किंवा जबाबदारी देत नाही, याबाबत तसा नियमही आहे. आता कोणाला आमदारकी द्यायची असेल तर पक्ष विचारत नाही. किंवा एखादी जबाबदारी द्यायची असेल तर विचारून देत नाही.

मला प्रदेशाध्यपदाची जबाबदारी देण्यात आली, मलाही पक्षाने विचारलं नाही, तुम्ही काम करा सांगितलं. शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे आणि त्या अनुषंगाने किरीट सोमय्या यांना पक्षाने जबाबदारी दिली. ते ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडतील”, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.