Maharashtra Assembly Election 2024 | सुप्रिया सुळेंकडून थेट काँग्रेसचा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीचा सांगितला फॉर्म्युला

भोर : Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा निवडणुकीची तयारी महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) सुरु केलेली आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप झाले नसले, तरी काही ठिकाणी उमेदवार निश्चित करण्यास सुरुवात झाली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भोर विधानसभा मतदारसंघाच्या (Bhor Assembly Constituency) उमेदवाराची भरसभेत घोषणा करुन टाकली. ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी “एकच वादा संग्राम दादा” अशा घोषणेसह थेट उमेदवारच जाहीर केला आहे.
काँग्रेसचे भोर मतदारसंघातील विद्यमान आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांची उमेदवारी सुळेंनी घोषित केली आहे. तालुक्यामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोंढावळे फाटा येथे झालेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे यांनी उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा उमेदवार निवडून आला असेल, त्याच पक्षाचा उमेदवार तिथे दिला जाईल. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारीबाबत कोणतीही घोषणा झाली नसली तरी काँग्रेसने आम्हाला विचारलं तर विधानसभा मतदारसंघाबाबत आमचं ठरलंय असं म्हणत, सुप्रिया सुळे यांनी आमदार संग्राम थोपटे यांचे नाव जाहीर केले.
याशिवाय भोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी एकच अर्ज केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे आता विषयच संपला असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी अनुमोदन दिले.