Shikrapur Pune Crime News | प्रेमविवाहानंतर चार महिन्यात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे : Shikrapur Pune Crime News | दोन्ही घरातील संमतीने त्यांनी प्रेमविवाह केला. पतीच्या त्रासाला कंटाळून चारच महिन्याच्या आत नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Newly Married Woman Suicide)
साक्षी विशाल साकोरे (वय २२, रा. पाचवड केंदुर, ता. शिरुर)असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याबाबत बाळासाहेब दगडु दौंडकर (वय ५१, रा. कन्हेरसर ता़ खेड) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात (Shikrapur Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल बबन साकोरे (रा. पाचवड केंदुर, ता. शिरुर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी साक्षी आणि विशाल यांचे प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबाचे सामजस्यातून त्यांचा १० मे २०२४ रोजी विवाह झाला. तेव्हापासून साक्षी केंदुर येथे रहात होती. ती माहेरी आली तरी विशाल तिला फोनवरुन शिवीगाळ करुन रात्रीच माहेरुन सासरी घेऊन जात होता. तिला विचारले असता तो कायम कामावरुन शिवीगाळ करीत असल्याचे साक्षी हिने फिर्यादीला सांगितले होते. विशाल याला फिर्यादी यांनी ५० हजार रुपयांची मदत केली होती. त्यानंतर त्याने एक महिन्यांपूर्वी शिक्रापूर येथील जागेच्या बांधकामासाठी मदत म्हणून पैशांची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी तुमचे बांधकाम चालू झाल्यानंतर तुम्हाला मदत करेन असे फिर्यादीने सांगितले होते. साक्षी ही कामात नवीन असल्यामुळे ई सेवा केंद्र दुकानात तिला पूर्ण काम येत नसल्याने विशाल तिला शिवीगाळ करणे, तिला मारायला धावणे व मारहाण करणे असे प्रकार वारंवार करुन मानसिक त्रास देत होता. याबाबत साक्षीचे सासु सासरे यांनी दोघात होणार्या भांडणाबाबत फिर्यादी यांना कोणत्याही गोष्टीची कल्पना दिली नाही. तिचे सासु सासरेही तिला त्रास देत असल्याचा फिर्यादी यांना संशय आहे. विशाल याच्या त्रासाला कंटाळून ३ व ४ च्या रात्री राहत्या घरी साक्षी हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब सकाळी उघड झाली. त्यानंतर विशाल याने सकाळी ९ वाजता साक्षीच्या आईला फोन करुन साक्षी हिने गळफास घेतल्याचे व तिचा मृत्यु झाल्याचे न सांगता केवळ केंदुरच्या घरी या असे बोलून फोन कट केला. फिर्यादी हे त्यावेळी कामानिमित्त रांजणगाव एम आय डी सी मध्ये गेले होते. त्यामुळे ते लगेच केंदुरला जाऊ शकले नाही. त्यानंतर दुपारी ४ वाजता विशालने फोन करुन “तुम्ही सकाळी आले नाही, त्यामुळे तुमची मुलगी राहिली नाही,” असे सांगितले. फिर्यादी यांचे मेव्हणे पवन सुर्वे यांनी सांगितल्यानंतर त्यांना आपल्या मुलीचा मृत्यु झाल्याचे समजले.
साक्षी हिच्यावर अंत्यसंस्कार प्रसंगी तिचा पती किंवा तिच्या सासरचे कोणीही उपस्थित नव्हते. धार्मिक विधी केल्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली असून शिक्रापूर पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.