Bhagyashree Atrams Halgekar | ठरलं! भाग्यश्री आत्राम हलगेकर तुतारी फुंकणार; अजित पवारांना पुन्हा धक्का

Bhagyashree Atrams

गडचिरोली : Bhagyashree Atrams Halgekar | धर्मरावबाबा आत्राम (Dharamrao Baba Atram) यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ‘शिवस्वराज यात्रा’ १२ तारखेला गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरीत प्रवेश करणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष (Sharad Pawar NCP) जयंत पाटील (Jayant Patil) आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या उपस्थितीत भाग्यश्री आत्राम हलगेकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

मागील काही दिवसांपासून भाग्यश्री आत्राम हलगेकर शरद पवार गटात प्रवेश करणार आणि वडिल धर्मराव बाबा आत्राम विरोधात लढणार अशा पद्धतीचे वक्तव्य माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केले होते. भाग्यश्रीने शरद पवार यांची भेटही घेतल्याची चर्चा होती.

पक्ष फोडी करणारा पक्ष आता माझं घर फोडण्याचे काम करीत आहे, असा आरोप नाव न घेता अजित पवार गटाचे नेते व अहेरीचे प्रतिनिधित्व करणारे राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी शरद पवार गटावर केला. एक मुलगी गेली तरी एक मुलगी आणि एक मुलगा माझ्याकडे आहे. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमची कशी होईल,असे धर्मरावबाबा आत्राम म्हणाले होते.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाग्यश्री आत्राम हलगेकर यांना समजवण्याचा प्रयत्न केला होता. “वडिलांचं जितकं प्रेम आपल्या लेकीवर असतं. तेवढं लेकीवर प्रेम कुणीच करू शकत नाही. असं असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. याचा अनुभव आम्ही पण घेतलेला आहे. साहेबांना सोडणं ही माझी मोठी चूक होती, मी हे मान्य केली आहे “, असे अजित पवारांनी सांगितले होते.

त्यानंतरही भाग्यश्री आत्राम हलगेकर तुतारी फुंकणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यामुळे विधानसभेला भाग्यश्री वडिल धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.