Aundh Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात बड्या आयटी कंपनीच्या संचालकाला सोसायटीने केले बहिष्कृत; सोसायटीच्या 13 पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : Aundh Pune Crime News | सोसायटीचा हिशोब मागितल्याने पदाधिकार्यांनी बड्या आयटी कंपनीच्या संचालकाला (IT Company) वाळीत टाकले असून त्यांची क्रूर चेष्टा केली जात आहे. त्यांच्या मुलीबरोबर सोसायटीत कोणी खेळायलाही येत नाही. कुटुंबावर बहिष्कार टाकल्याने चतु:श्रृंगी पोलिसांनी (Chaturshringi Police Station) महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृत लोकांचे सरंक्षण ३ अंतर्गत सोसायटीच्या १३ पदाधिकार्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Supriya Towers Aundh)
रुपेश जुनावणे (वय ४७), दत्तात्रय साळुंखे (वय ५०), अश्विनी पंडित (वय ६०), अश्विन लोकरे (वय ५०), सुनिल पवार (वय ५२), जगन्नाथ बुर्ली (वय ५०), अनिरुद्ध काळे (वय ५०), सुमीर मेहता (वय ४७), संजय गोरे (वय ४५), शिल्पा रुपेश जुनावणे (वय ४५), अशोक खरात (वय ५०), वैजनाथ संत (सर्व रा. सुप्रिया टॉवर्स, नागरस रोड, औंध) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी एका ४४ वर्षाच्या नागरिकाने चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०१५ पासून मार्च २०२४ पर्यंत सुरु आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी सुप्रिया टॉवर्समध्ये २००३ मध्ये फ्लॅट घेतला होता. तो त्यांनी भाड्याने दिला होता. त्यानंतर ते फ्लॅटवर स्वत: राहण्यास आले. त्यांनी आरोपींकडे सोसायटीचा हिशोब मागितला. तेव्हा रुपेश जुनावणे यांनी तो दिला नाही. त्यानंतर सोसायटीमध्ये राहणार्यांनी हेतुपुरस्पर त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांना बहिष्कृत केले गेले. वैजनाथ संत याने पेटत्या दिव्यावर नारळ फोडून इतर सदस्यांनी फिर्यादीचे कुटुंबियाचे क्रुर चेष्टा केली.
फिर्यादी यांचे कुटुंबियांना कोणत्याच कार्यक्रमात भाग घेऊन दिला जात नाही. त्यांच्याबाबत दुजाभाव करुन मानसिक त्रास दिला जातो़ शिल्पा रुपेश जुनावणे या फिर्यादीच्या फ्लॅटचा जोराजोरात दरवाजा वाजवून फिर्यादीचे मुलीला घाबरवून सोडतात. फिर्यादीच्या मुलीबरोबर कोणीही खेळत नाही. त्यांना फिर्यादीचा फ्लॅट गिळंकृत करावयाचा असल्याने सर्व मिळून संगनमत करुन त्रास देत आहे. फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांची सोसायटीमध्ये बदनामी करत आहेत. त्यामुळे फिर्यादी यांच्या पत्नीला मानसिक त्रासास तोंड द्यावे लागले. पदाधिकार्यांनी सोसायटीच्या मोठ्या रक्कमेचा अपहार केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक करांडे तपास करीत आहेत.