Parshuram Wadekar | बेताल व्यक्तव्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी; परशुराम वाडेकर यांची मागणी
परशुराम वाडेकर यांच्याकडून आमदार राणे यांच्या व्यक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध
पुणे : Parshuram Wadekar | आमदार नितेश राणे (Nitesh Rane) हे सातत्याने सामाजिक समतोल बिघडेल अशी बेताल वक्तव्य करत आहेत. मुस्लिमांना मज्जीदीत जाऊन चुन चुन के मारेंगे, पोलीस माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत या सारख्या वक्तव्यांमुळे मुस्लिम समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, एका सांविधानिक पद्धतीने निवडून आलेल्या आमदाराच्या तोंडी अशी हिंसक भाषा शोभत नाही, आम्ही त्यांच्या व्यक्तव्याचा तीव्र निषेध करतो, तसेच राणे यांनी भविष्यात अशी प्रक्षोभक वक्तव्य करू नये आणि मुस्लिम समाजाची माफी मागावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे राज्य संघटक परशुराम वाडेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
वाडेकर यांनी आपल्या पत्रकात पुढे म्हटले आहे कि, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. अलीकडे राज्यातील काही नेते जाणीवपूर्वक हिंदू – मुस्लिम समाजात दुही निर्माण होईल अशी वक्तव्य करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही वक्तव्ये करण्यात येत आहेत याचा परिणाम महायुती मधील आमच्यासारख्या सहयोगी पक्षांना बसू शकतो. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही काही नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे संविधान बदलाच्या चर्चा सुरू झाल्या त्याचा परिणाम महाराष्ट्रातील महायुतीच्या मतांवर झाल्याचे दिसते. रिपब्लिकन पक्ष भारतीय संविधानाला मानणारा आणि धर्मनिरपेक्षतेला प्राधान्य देणारा आहे. सामाजिक सलोखा राखण्यास नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहे. एखाद्या नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणाने समाजातील एखाद्या घटकाला असुरक्षित वाटेल असेल तर त्या समाजाच्या रक्षणासाठी आम्ही सदैव पुढे राहू. राणे यांनी मशीद मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मुस्लिम समाजाच्या संरक्षणासाठी पुढे येणार असल्याचेही वाडेकर यांनी म्हटले आहे,
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदू – मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी करू नये यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सक्त ताकीद द्यावी तसेच अन्य नेत्यांना आणि संतांना सुद्धा बेताल, हिंसक प्रक्षोभक वक्तव्य करू नयेत अशी समज द्यावी अशी मागणी परशुराम वाडेकर यांनी केली आहे.