Bhiwandi ACB Trap Case | ‘लाडकी बहिण’साठी डुप्लिकेट शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी लाच घेणारे क्लार्क, मुख्याध्यापिका जाळयात, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

भिवंडी : Bhiwandi ACB Trap Case | लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana) फॉर्म भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक होता. हा दाखला मिळण्यासाठी ८०० रुपयांची लाच घेताना रॉबिया गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापिका आणि ज्युनिअर क्लार्कला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. (Bhiwandi Bribe Case)

मुख्याध्यापिका तबस्सुम नियाज अहमद मोमीन (Tabassum Niaz Ahmed Momin) आणि क्लार्क मोमीन मोहम्मद तलाहा इकबाल (Momin Mohammad Talaha Iqbal) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदार महिला यांना लाडकी बहिण योजनेचा फॉर्म भरायचा होता.

परंतु, त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला नव्हता. त्यासाठी तक्रारदार या राबिया गर्ल्स हायस्कुलमध्ये गेल्या. क्लार्क इकबाल याने त्यांना डुप्लिकेट शाळा सोडल्याचा दाखला हवा असेल तर १ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. मुख्याध्यापिका तबस्सुम मोमीन यांनीही एक हजार रुपये दयावे लागतील, असे सांगितले. शाळा सोडल्याचा दाखला देण्यासाठी कोणतेही शुल्क नसताना ते लाच घेत असल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी करताना तबस्सुम यांनी तडजोडीअंती ८०० रुपये स्वीकारण्याचे मान्य केल़े. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शाळेत सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून ८०० रुपयांची लाच स्वीकारताना मोमीन इकबाल याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर मुख्याध्यापिका तबस्सुम मोमीन यांनाही पकडण्यात आले.