ST But Strike | ‘रात्री 12 पासून चक्काजाम करून संप करा’, आमदार गोपीचंद पडळकरांचा एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा; महायुती सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता

मुंबई : ST But Strike | महाराष्ट्र राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने विविध मागण्यांना घेऊन मंगळवारी (दि.३) बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी एसटी कर्मचारी आंदोलन केले जात आहे. त्याचा मोठा फटका राज्यभरातील प्रवाशांना बसताना दिसून येत आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने प्रवाशांना विशेषतः कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. (Maharashtra Bus Workers Strike)
महायुती सरकारच्या (Mahayuti Govt) काळात पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. एसटी कामगारांच्या संपाला विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) – सदाभाऊ खोत (Sadabhau Koht) यांनीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यव्यापी एसटी आंदोलनाने महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरोधात रान पेटवणारे खोत आणि पडळकर आता महायुती सरकारची डोकेदुखी वाढवण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी बुधवारी (दि.४) बैठक बोलवलेली आहे. अशातच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मात्र सरकारविरोधातच उभे ठाकले आहेत. एसटी कामगारांच्या संपाबाबत दोन आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
रात्री १२ पासून चक्काजाम करून संप करावा, आम्ही पाठिशी आहोत, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी बेमुदत संपाची हाक देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहेत. पडळकर यांनी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांनीही पगार देण्यात यावा अशी मागणी सरकारकडे केली आहे. एसटी महामंडळाचे विलिनीकरण करता येणं शक्य आहे की नाही याची स्पष्टता कामगारांना हवी असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.