Maharashtra Assembly Election 2024 | राष्ट्रवादीची पक्ष नेत्यांसोबतची बैठक संपली; 60 चं जागा लढणार ही बातमी चुकीची; विद्यमान जागांचे सूत्र ठरले

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी अजित पवार गटाची (Ajit Pawar NCP) बैठक आज पार पडली. या बैठकीत पक्ष किती जागा लढणार तसेच मतदारसंघ कोणते असतील याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
पक्षाच्या ५४ आणि अपक्षांच्या ६ जागा ते धरून पुढे कामाला लागा असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बैठकीत सांगितले. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना उमेदवारी दिली जावी. जागावाटपाची प्राथमिक बैठक झालेली आहे अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी दिली.
सुनील तटकरे म्हणाले, ” काही दिवसांपूर्वी महायुतीची (Mahayuti Meeting) नागपूरात बैठक झाली, त्यात जागावाटपाचा सर्वसाधारण फॉर्म्युला काय असावा याची प्राथमिक चर्चा झाली. त्यावर आज राष्ट्रवादीच्या बैठकीत चर्चा झाली. गणेशोत्सवानिमित्त काही काळ जनसन्मान यात्रा थांबवावी लागेल. पक्षातील कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम दिले जातील यावर आज चर्चा झाली.
मागील वेळी आपण ५४ जागा जिंकल्या होत्या. त्यासोबतच जे अपक्ष आपल्यासोबत आहेत ते धरून ६० चा आकडा आहे. ते धरून तुम्ही पुढे वाटचाल करा असे अजितदादांनी म्हटले. परंतु आम्ही ६० चं जागा लढणार ही बातमी चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ” त्याशिवाय लोकसभा निवडणुकीत जागावाटप करताना विद्यमान जागांचे सूत्र होते. २०१९ च्या लोकसभेत राष्ट्रवादीच्या ४ जागा निवडून आल्या होत्या. शिवसेना आणि भाजपा एकत्रित लढले होते. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात त्यांना यश मिळाले होते.
त्यामुळे स्वाभाविकच त्यांच्या विद्यमान जागा जास्त होत्या. लोकसभेत त्याप्रमाणे सूत्र होते. आता यावेळी सुद्धा तेच असेल. निवडून येण्याची क्षमता असलेला उमेदवार असावा असाही निकष जागावाटपात असावा असं बैठकीत ठरवलं आहे”,असे सुनील तटकरेंनी सांगितले.