Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचे मध्यप्रदेश कनेक्शन; विजयाच्या शिल्पकारांना मोठी जबाबदारी

PM-Modi-Amit-Shah.

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला. त्यानंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने (BJP) कंबर कसली आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपला मतदारांनी नाकारल्याने केंद्रात सरकार स्थापनेसाठी भाजपला मित्रपक्षांची गरज भासली.

लोकसभेला मध्यप्रदेशात सगळ्याच्या सगळ्या २९ जागांवर भाजपने विजय मिळवला. आता या विजयाच्या शिल्पकारांना महाराष्ट्र विधानसभेची जबाबदारी देण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील चौघांना भाजपने महाराष्ट्रात महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

यातील तिघे मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे माजी जनरल सेक्रेटरी कैलाश विजयवर्गीय, मंत्री प्रल्हाद पटेल, विश्वास सारंग आणि माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा या चार नेत्यांची निवड मिशन महाराष्ट्र फत्ते करण्यासाठी नेतृत्त्वाकडून करण्यात आलेली आहे.

कैलास विजयवर्गीय यांच्याकडे नागपूर , प्रल्हाद पटेल यांच्याकडे वर्धा, अमरावती, युवानेते विश्वास सारंग यांच्याकडे अकोला, बुलढाणा तर माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रांना भंडारा, गोंदियाची जबाबदारी देण्यात आली आहे.

२०१४ आणि २०१९ मध्ये भाजपला विदर्भात घवघवीत यश मिळालं. पण यंदाच्या लोकसभेला विदर्भात भाजपला केवळ दोन जागा निवडून आणता आल्या. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विदर्भातील ६२ पैकी ४४ जागा जिंकल्या. २०१९ ला हा आकडा २९ वर आला. त्यामुळे आता मध्यप्रदेशच्या नेतृत्वाकडे याबाबतची काही जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे.