Yerawada Pune Crime News | सकाळी-सकाळी दारुला पैसे न दिल्याने पत्नीवर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

husband-wife-6

पुणे : Yerawada Pune Crime News | दारुला पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात, पाठीवर, खांद्यांवर कोयत्याने सपासप वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी लक्ष्मीनगरमध्ये राहणार्‍या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बंडू हरीशचंद्र कांबळे (वय ४६, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्या खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना लक्ष्मीनगरमधील राहत्या घरी रविवारी सकाळी पावणेसात वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंडु कांबळे याला दारुचे व्यसन आहे. यामुळे दोघा पतीपत्नीत नेहमीच भांडणे होत होती. शनिवारी रात्री त्यांच्यात याच कारणावरुन भांडणे झाली होती. रविवारी सकाळी पावणेसात वाजता बंडु कांबळे याने पुन्हा भांडण सुरु केले. मला दारुसाठी पैसे देणार नाही, थांब तुला आता कायमची संपवूनच टाकतो, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून त्याने कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यावर मध्यभागी, उजव्या दंडाच्या पाठीमागील बाजूस, खांद्यावर, कपाळावर सपासप वार केले. त्यामध्ये फिर्यादी या गंभीर जखमी झाल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सावंत तपास करीत आहेत.