Pune Pimpri Chinchwad Crime News | पत्नीला गाडीवर पाहून पतीने मित्राची केली भर रस्त्यात धुलाई; कारण मात्र होते वेगळेच

Crime-4

पुणे : Pune Pimpri Chinchwad Crime News | रस्त्याने जात असताना तिला पतीचा फोन आला. तिने मित्राच्या गाडीवरुन जात असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांना रस्त्यातच थांबायला पतीने सांगितले. पती तेथे आला अन त्याने तिच्या मित्राची भर रस्त्यात धुलाई केली. प्रत्यक्षात कारण मात्र वेगळे होते.

याबाबत पिंपरी गाव येथे राहणार्‍या एका ३० वर्षाच्या तरुणाने भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मेहरोज फिरोज खान (रा. खडकी बाजार) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपरीत जुने मोबाईल खरेदी विक्रीचे दुकान आहे. त्यांच्या मैत्रिणीचा त्यांना फोन आला की त्यांची तब्येत बरी नाही, तेव्हा एम्पायर इस्टेट येथील ऑफिसमधून घरी सोडशिल का, अशी तिने विचारणा केली. तो तिला खडकी येथील घरी सोडण्यास आला. दोघे दुचाकीवरुन जात असताना त्याच्या मैत्रिणीला तिच्या पतीचा फोन आला. तिने फिर्यादीबरोबर घरी जात असल्याचे सांगितले. त्यावर त्याने तुम्ही आहात, तेथेच थांबा, मी तेथे येतो. ते कासारवाडी मेट्रो स्टेशनच्या खाली थांबले. तिचा पती टेम्पो घेऊन आला. त्याने गाडीतून उतरुन काही एक न विचारता, फिर्यादी यांना हाताने व त्याच्याकडील चावीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी हे खाली पडले व आरडाओरडा करु लागले. तेव्हा जमा झालेल्या लोकांनी फिर्यादीला सोडविले. या मारहाणीत फिर्यादीच्या डोक्यास, ओठास, दोन्ही गालावर मार लागला. मोबाईल फोन फुटून त्याचे नुकसान झाले. वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन त्यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार रवींद्र जाधव तपास करीत आहेत.