Police Washing MLA’s Car | पोलीस संरक्षणासाठी की आमदाराची गाडी धुण्यासाठी? काँग्रेसच्या माजी आमदाराचा महायुती सरकारला सवाल (Video)

बुलढाणा : Police Washing MLA’s Car | आगामी विधानसभा निवडणुकांची (Maharashtra Assembly Election 2024) तयारी सर्वच पक्षांनी सुरु केलेली आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक मुद्यांना घेऊन एकमेकांवर आरोप करताना दिसत आहेत. बुलढाण्यात माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची गाडी एक पोलीस कर्मचारी धूत असल्याचा व्हिडिओ टाकत सरकारवर जोरदार टीका केली आहे. (Buldana News)
महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी रक्षणासाठी आहेत की आमदारांची गाडी धूण्यासाठी आहेत असा सवाल काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना केला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत एकटा पोलीस कर्मचारी रस्त्यावर उभी असलेली गाडी धुताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी त्याच्या अंगावर खाकी आहे. म्हणजेच कर्तव्यावर असताना तो हे काम करत होता. हा व्हिडीओ पोस्ट करताना हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी? अशी विचारणा केली आहे. तसंच पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पोस्टमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांनी लिहिलं आहे की, “कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र पोलीस शर्म करो ! सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीद अंगीकारणारी महाराष्ट्र पोलीस यंत्रणा जनतेच्या व आया बहिणीच्या सुरक्षेसाठी आहे, की आमदाराच्या गाड्या धुण्यासाठी?”.
“दोन दिवसांपूर्वी आमदारांनी असंवेदनशील वक्तव्य केलं होतं! मुख्यमंत्री काय शाळेत जाऊन पहारा देणार आहेत का? एस. पी. आरोपीच्या घरी जाऊन बसणार आहेत का? आज सकाळी या प्रश्नाचे उत्तर मिळाले. पोलीस आमदारांच्या गाड्या धुणार आहे . . . . ! पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना. पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा,” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.