Pune Crime News | सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी महंत रामगिरी महाराजांविरुद्ध पुण्यात गुन्हे दाखल

पुणे: Pune Crime News | महंत रामगिरी महाराज यांच्याविरुध्द खडक पोलिस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून सामाजिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत शोएब इस्माईल शेख (वय ६२, रा. घोरपडे पेठ) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून महंत रामगिरी महाराज (रा. सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान, ता. श्रीरामपूर, जि.अहमदनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगिरी महाराज यांनी जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करून त्याचे चित्रीकरण सोशल मीडियावर प्रसारित केले. त्यामुळे इतर समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेला बाधक आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे वक्तव्य केल्याचे शेख यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) शर्मिला सुतार करीत आहेत.
तसेच या प्रकरणी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुध्द कोंढवा पोलिस ठाण्यातही आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याची तक्रार ऍड तौसिफ़ चाँद शेख (एनआयबीएम रस्ता ,कोंढवा) यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील करीत आहेत.