Kolhapur Girl Assault Murder Case | बदलापूरनंतर आता कोल्हापुरात 10 वर्षाच्या मुलीची अत्याचार करून हत्या

कोल्हापूर: Kolhapur Girl Assault Murder Case | बदलापूरमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार (Badlapur School Girl Incident) केल्याची घटना ताजी असतानाच कोल्हापुरात धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील शिये गावातील रामनगर परिसरात १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. सबंधित मुलगी काल दुपारपासून बेपत्ता होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलगी मूळची बिहारची असून, ती आपल्या आई-वडील आणि पाच भावंडांबरोबर रामनगर परिसरात राहत होती. मुलीचे आई-वडील शिरोली एमआयडीसीतील एका कारखान्यात मजूर म्हणून कामाला जात होते. सकाळपासून मुलगी बेपत्ता असल्याने तिच्या पालकांनी शिरोली एमआयडीसी पोलिसांत काल (दि.२१) सायंकाळी तक्रार दाखल केली होती.

यानंतर आज पोलिसांनी डॉग स्कॉडच्या मदतीने मुलीला शोधून काढले. शिये पासून काही अंतरावर असलेल्या शेतात या पीडित मुलीचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह आता वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, वैद्यकीय अहवाल आल्यानंतर याबाबत अधिकचा खुलासा करता येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.