Pune Crime Branch News | दुचाकीच्या सीसीटीव्ही फुटेजमुळे मंदिरातील दानपेटी चोरी करणारे जेरबंद ! रात्री दुचाकी चोरुन चोरी करायचे पुन्हा गाडी आणून ठेवायचे जागेवर

20th August 2024

पुणे : Pune Crime Branch News | एका पाठोपाठ एक अशा मंदिरातील दानपेटी चोरीच्या घटनांमध्ये सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मोटारसायकल आढळून आली. त्यावरुन पोलीस चोरट्यांपर्यंत पोहचले व त्यांनी दोन अल्पवयीन मुलांसह एकाला पकडले. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कामगिरी केली. (Arrest In Theft Case)

चोरटे हे रात्रीच्या वेळी बनावट चावीने मोटारसायकल चोरुन नेत. चोरी करुन झाली की पुन्हा त्याच जागी मोटारसायकल आणून लावत असे.
साहिल अशोक माने (वय १९, रा. इंदिरा वसाहत, औंध) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने दोघा अल्पवयीन मुलांच्या सहाय्याने संत तुकाराम पादुका मंदिर, शनिपार चौक येथील देवी मंदिर आणि नारायण पेठेतील प्रगतीशील मित्र मंडळ गणपती मंदिर येथील दान पेटी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.

भरवस्तीमध्ये मंदिरामधील दानपेटी चोरीसारखे गुन्हे घडल्याने गुन्हे शाखेचे युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी घटनास्थळापासून विविध भागातील सी सी टीव्ही फुटेज पहाण्यासाठी पोलीस अधिकारी आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार निलेश साबळे, दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, महेंद्र तुपसुंदर हे तपास पथक तयार केले. मिळालेल्या फुटेजची पहाणी करीत असताना पोलीस अंमलदार निलेश साबळे व दत्ता सोनावणे यांनी गुन्हा करण्याच्या वेळी आरोपीचे सीसीटीव्ही फुटेजमधील दुचाकीचा नंबर मिळविला. त्यावरुन गाडी मालकाचा नाव पत्ता मिळवून त्याच्याकडे चौकशी केली.

त्याला त्याच्या गाडीचे फुटेज दाखविल्यावर त्याने ट्रिपल शिट असलेल्या मुलांपैकी दोन मुलांना ओळखत असल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी इंदिरा वसाहत झोपडपट्टीतील दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी साहिल माने याच्याबरोबर मंदिरातील दानपेटी चोरीची कबुली दिली. त्यानंतर साहिल माने हा घरी आला असताना पाळतीवर असलेल्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. त्यांच्याकडून विश्रामबागचे २ आणि चतु:श्रृंगी व डेक्कनचे प्रत्येकी एक असे चोरीचे ४ गुन्हे उघडकीस आणले आहेत.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सांगितले की, मंदिरातील दानपेटी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस पथकाने २०० ते २५० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासल्यानंतर चोरट्यांच्या मोटारसायकलचा नंबर मिळविण्यात यश आले. त्यानंतर मोटारसायकलच्या मालकाकडे चौकशी केली. इंदिरा वसाहत झोपडपट्टीत हा मालक आपली मोटारसायकल घराच्या बाहेर काही अंतरावर रात्री पार्क करीत असे. त्यालाही आपल्या मोटारसायकलचा वापर चोरीसाठी होत असल्याची कल्पना नव्हती. त्यानंतर इंदिरा वसाहतीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर चोरटे रात्री बनावट चावीचा वापर करुन मोटारसायकल चोरुन नेत़ त्यानंतर चोरी करुन परत आल्यावर पुन्हा त्याच जागी मोटारसायकल आणून लावत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आले.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, निलेश साबळे, महेश बामगुडे, महेंद्र तुपसुंदर, आण्णा माने, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, विठ्ठल सांळुखे, रुक्साना नदाफ यांनी केली आहे.