Maharashtra Assembly Election 2024 | मविआत मोठा पेच? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत केली मागणी, म्हणाले – ”शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करा”

मुंबई : Maharashtra Assembly Election 2024 | ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री, हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला. त्यासाठी माझी काहीही हरकत नाही, अशी अट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना घातल्याने मविआत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे मुंबईतील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मेळाव्या बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीची पहिल्यांदाच संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केला. या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असे मी ठरवले. ओपनिंग बॅट्समनचे कसे असते, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर बाकीचे प्लेअर खेळणारे आहेतच, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाच्या (BJP) युतीत असताना आम्ही जो अनुभव घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नको. आम्ही 30 वर्षे शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असे जाहीर केले जायचे.

ते पुढे म्हणाले, एकमेकांच्या पायावर धोंडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो. तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल, म्हणून तुझी जागा मी पाडायचो आणि माझी जागा तू पाडायची असे व्हायचे. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिले नाही.

महाविकास आघाडीला आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, जागावाटपवरून भांडण करू नका, कामात वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतली आहे. काँग्रेसचा हात, सेनेची मशाल, आणि हातात पवार साहेबांची तुतारी असलेला मावळा गावागावात पोहोचवा. मी पुन्हा एकदा सांगतो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा पण जागा वाटपात भांडण करू नये.

महायुती सरकारवर (Mahayuti Govt) टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवणार्‍याला 10 हजार रुपये महिना दिले जात आहेत. त्या कामासाठी त्यांनी योजनादूत नेमले आहेत. हा लोकांचा पैसा आहे. अशा योजनांमध्ये राज्याची लूट होत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, अडीच वर्ष काय काम केले ते लोकांपर्यंत पोहचवा. होऊन जाऊ दे चर्चा. तुम्ही काय केले आम्ही काय केले? यावर चर्चा करू. विधानसभा निवडणूक 1 महिना पुढे ढकलण्यावर विचार सुरू आहे. लाडकी बहीण योजना आणली, पण पैसा कुठे? अधिकारी मला सांगतात की, साहेब तुम्ही लवकर या. हेच या गद्दारांचे खरे रुप आहे. सरकार पडायला 50 खोके आणि लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले जात आहेत.

मोदी सरकारवर (Modi NDA Govt) टीकास्त्र डागताना उद्धव ठाकरे म्हणाले, मुस्लिम समाजाने आपल्याला भरभरून मतदान केले. कोरोनामध्ये मी या समाजासाठी काम केले. एनआरसी, सीसीए आंदोलनावेळी आम्ही मुस्लिमांसोबत होतो. मोदींनी आग लावण्यासाठी वक्फ बोर्ड सुधारणा बिल आणले आहे. हे विधेयक बहुमत असताना मंजूर का केले नाही. वक्फ बोर्डाच्या (Waqf Board) जमिनी तुमच्या लाडक्या उद्योगपतींना देणार असाल, तर त्याला आम्ही विरोध करू.

मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच निवडणूक जाहीर करा. तुम्ही राज्यात ओबीसी मराठा (OBC Maratha Reservation Issue) वाद लावला आहे. मराठा आरक्षण बिल लोकसभेत आणा, आम्ही त्याला पाठिंबा देऊ. मुंबईतसुद्धा अनेक अडचणी आहेत. मोदी-शाह हे मुंबईकडे सोन्याचे अंडे देणारी कोबंडी म्हणून पाहात आहेत. या कोंबडीला आपल्याला कापू द्यायचे नाही.