Bibvewadi Pune Crime News | हरवलेली मतीमंद मुलगी सीसीटीव्हीत कैद झाली आणि अपहरणाच्या शक्यतेने उडाली खळबळ, रात्रभर शहर पोलिसांनी घेतला शोध

16th August 2024

पुणे : Bibvewadi Pune Crime News | बिबवेवाडी येथील एक १० वर्षाची मतीमंद मुलगी हरविली (Girl Missing Case). पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर तिचा शोध सुरु झाला. कात्रज येथील एका चौकातील सीसीटीव्हीमध्ये ही मुलगी कैद झाली. त्याचवेळी तिच्या आजूबाजूला असलेल्या संशयितामुळे तिचे अपहरण झाल्याची शक्यता व्यक्त झाली. त्याबरोबर संपूर्ण पुणे शहर पोलीस दल अर्लट झाले.

स्वत: पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांनी रात्री उशिरा भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याला (Bharti Vidyapeeth Police Station) भेट देऊन मुलीच्या शोधाबाबत तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली. संपूर्ण क्राईम ब्रांचही (Pune Crime Branch) या मागे लागली. ३०० पोलीस रात्रभर शोध घेत असताना पहाटे दीड वाजता ही मुलगी सुखरुप सापडली. तेव्हा पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

याबाबतची माहिती अशी, बिबवेवाडी येथील एका कामगाराची १० वर्षाची मतीमंद मुलगी हरविली होती. कोणाला काही न समजता ही मुलगी निघून गेली होती. बिबवेवाडी पोलिसांनी या मुलीच्या हरविल्याची माहिती सर्वत्र पाठविली होती. सायंकाळच्या सुमारास कात्रज येथील एका चौकामधील सीसीटीव्हीमध्ये ही मुलगी दिसून आली.

त्यानंतर ती कोठे गेली हे समजू शकले नव्हते. त्याचवेळी तिच्या आजूबाजूला काही संशयित दिसून आल्याने या मुलीचे अपहरण झाले की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली. त्यामुळे संपूर्ण पुणे शहर पोलीस दल अर्लट झाले. गुन्हे शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांनी संपूर्ण शहरात मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याला भेट दिली. पोलीस उपायुक्त संदिप सिंह गिल (Sandeep Singh Gill) यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तपासाच्या दृष्टीने काही सूचना दिल्या. जवळपास ३०० पोलीस अधिकारी व कर्मचारी या मुलीचा रात्रभर शोध घेत होते. त्यानंतर पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास कोंढवा परिसरात ही मुलगी सुखरुप सापडली. तिचे अपहरण वगैर काही झाले नसून तिला काही सांगता येत नसल्याने ती अशीच भटकत तिकडे गेल्याचे समोर आल्यावर पोलिसांचा जीव भांड्यात पडला.

स्वातंत्र्य दिनाचा आदल्या रात्रीपासून सुरु असलेला अलर्ट ही मुलगी सापडल्यानंतर संपला अन वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी नि:श्वास सोडला.