Pune-Bangalore Expressway Accident | पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीसह एसटी बस पेटून जळून खाक; दुचाकी चालकाचा होरपळून मृत्यू

Pune-Bangalore Expressway Accident

सातारा : Pune-Bangalore Expressway Accident | पुणे-बंगळूरु महामार्गावर बुधवारी (दि.१४) सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास विचित्र अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. दुचाकी व एस.टी. बस अपघातात दुचाकी पेटल्याने एस.टी. बसही पेटली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. मदतकार्य वेळेत पोहचल्याने व प्रसंगावधान राखल्याने ३५ प्रवाशी बचावले आहेत.

हा अपघात साताऱ्यातल्या भुईंज-पाचवड दरम्यान महामार्गावरील हॉटेल विरंगुळासमोर घडला आहे. या अपघातात एस.टी बससह दुचाकी जळून खाक झाली आहे. सुदैवाने ३५ प्रवाशी वाचले आहेत.

पुण्याहून सातारा बाजूकडे जाणाऱ्या कार चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी चालकाला एस.टी. बस त्र्यंबकेश्वर ते पलूस जाणाऱ्या बसने MH 40 AQ 6303 ने पाठीमागून जोरदार धडक दिली. घडलेल्या अपघातात चालकासह दुचाकीने पेट घेतला व त्याचवेळी एस.टी. बसही पेटली. प्रसंगावधान राखत मदतकार्य करणाऱ्यांनी एस.टी. बसमधील प्रवासी यांना सुखरूप बाहेर काढले. घटनेत दुचाकी चालकाचा होरपळून मृत्यू झाला.

घटनास्थळी भुईंज पोलीस ठाण्याचे (Bhuinj Police Station) सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे (API Ramesh Garje) फौजफाटा घेऊन पोहोचले. किसनवीर कारखाना आणि वाई नगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणांनी मदतकार्य करून आग आटोक्यात आणली. यादरम्यान सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.

या अपघातातील पेटलेली दुचाकी व दुचाकी चालकाची ओळख पटवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत चालू होते. दरम्यान पोलीसांनी जळून खाक झालेल्या मोटार सायकलच्या चेसी नंबरवरून माहिती घेतली असता ती गाडी यामाहा कंपनीची असून ती स्वप्नील शरद डुबल रा. वडवली ता. कराड जि. सातारा यांच्या नावावर असल्याची माहिती मिळाली आहे.