Sushma Andhare On Ajit Pawar | “असा कोणता पार्लमेंट्री बोर्ड असतो, जो भुजबळांसारख्या…” सुषमा अंधारेंचा अजित पवारांवर निशाणा, म्हणाल्या – ” वरातीमागून घोडे नेण्यात…”
पुणे : Sushma Andhare On Ajit Pawar | लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं. त्यावेळी माझ्याकडून थोडी चूक झाली. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. अशी कबुली काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. त्यांच्या या कबुलीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, अजित पवार जे काही बोलले, हा दोन कुटुंबाचा आणि दोन पक्षांचा प्रश्न आहे. मला त्यावर जास्त काही बोलायचं नाही. पण वरातीमागून घोडे नेण्यात काहीच अर्थ नसतो. वेळ गेल्यावर जे सुचतं त्याला मनाचा मोठेपणा म्हणता येणार नाही.
काल अजित पवार यांनी जे काही विधान केलं त्यानंतर अनेकांनी हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे वगैरे म्हटलं, पण ही तीच लोक होती, जी लोकसभा निवडणुकीपूर्वी खालच्या पातळीवर जाऊन सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करत होती. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला.
हा रोष आगामी निवडणुकीतही बघायला मिळू शकतो, असं लक्षात आल्याने त्यांना शहाणपण सुचलं आहे. त्याला काहीही अर्थ नाही. हे त्यांना तेव्हा सुचायला पाहिजे होतं, जेव्हा रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी आणि संजय शिरसाट यांच्यासारखी लोकं खालच्या पातळीवर जाऊन सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलत होती.
त्या पुढे म्हणाल्या, असा कोणता पार्लमेंट्री बोर्ड असतो, जो सातत्याने कुटुंबातल्या लोकांनाच निडणुकीचं तिकीट द्या किंवा राज्यसभा द्या, असं सांगतो आणि जो छगन भुजबळांसारख्या लोकांना काहीच देऊ देत नाही. असा हा पार्लमेंट्री बोर्ड माझ्या आकलनाबाहेर आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.