Sinhagad Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलावरून उद्यापासून वाहतुक सुरू होणार; नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका (Video)

Sinhagad Road Flyover

पुणे : Sinhagad Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल चौकातील उड्डाणपुलाचे (Rajaram Bridge Chowk Flyover) काम पूर्ण झाले आहे. पावसाने उघडीप दिल्याने उड्डाणपुलावर डांबराचा शेवटचा थर मारला गेला आहे. उदघाटन होत नसल्याने याबाबत टीका केली जात होती. अखेर या उड्डाणपुलाच्या उदघाटनाचा मुहूर्त ठरला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते उद्या (दि.१५) गुरुवारी सकाळी सात वाजता या उड्डाणपुलाचे उदघाटन होणार आहे. या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फन टाईम थिएटर (Fun Time Theatre) दरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे. त्यामध्ये राजाराम पूल चौकातील उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाची संततधार सुरू होती. खडी ओली असल्याने डांबराचा प्लॅट बंद होता. पावसात ५० मि.मी.चा डांबराचा थर मारल्यास रस्ता लगेच खराब होऊन खड्डे पडू शकतात. त्यामुळे महापालिकेवर नागरिक लगेच टीकेची झोड उठवतील त्यामुळे कामाला दिरंगाई झाल्याचे बोलले जातेय.

या उड्डाणपुलावरून वाहतुक सुरू करावी यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Sharad Pawar NCP) वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतरही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. त्यावरून टीकेची झोड उठवली जात होती.

अखेर या उड्डाणपुलाच्या उदघाटनाचा मुहूर्त ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदया सकाळी ७ वाजता या उड्डाणपुलाचे उदघाटन होणार आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची वाहतुक कोंडीतुन सुटका होण्याची शक्यता आहे.